आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cycle Subcidy Now On Girl Account, Human Development Mission Proposal

सायकलींचे अनुदान मुलींच्या खात्यावर,मानव विकास मिशनचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मानव विकास मिशनच्या माध्यमातून 22 जिल्ह्यांतील 125 तालुक्यांत आठवी ते बारावीपर्यंतच्या दारिद्रय़रेषेखालील मुलींना सायकली वाटण्यात येतात. यात सायकलींची रक्कम मुलींच्या खात्यात जमा करावी, असा प्रस्ताव मानव विकास मिशनने राज्य सरकारकडे पाठवला आहे. सुमारे 60 ते 70 हजार मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे.

मिशनमार्फत 2012 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. 12 जुलै 2012 रोजी त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला होता. यामध्ये शाळेचे अंतर 1 कि.मी. पेक्षा जास्त आणि पाच कि.मी.पेक्षा कमी असा निकष होता.
मात्र गेल्या वर्षी टेंडर निघालेच नाही. त्यामुळे मुलींना सायकली मिळाल्या नाहीत. त्यामुळे या वर्षी मुलींना सायकलींसाठी प्रत्येकी 3400 ते 3600 रुपये मुलीच्या खात्यावर जमा करावेत, असा प्रस्ताव आहे. योजनेसाठी प्रत्येक तालुक्यासाठी सुमारे 20 लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्यासाठी साधारण साठ हजार मुलींसाठी 20 ते 25 कोटी रुपये लागणार आहेत. निधीची कमतरता नसल्याचे मानव विकास मिशनच्या आयुक्तांनी सांगितले आहे.

गतवर्षी अपर मुख्य सचिव नियोजन, मानव विकास आयुक्त आणि इतर अधिकार्‍यांच्या बैठकीत टेंडर रद्द करण्यात आले होते. या योजनेबाबतच्या नव्या प्रस्तावानुसार लाभार्थींनाच त्यांच्या आवडीनुसार सायकल घेता येईल. याबाबत शालेय शिक्षण समितीला अधिकार देण्याचा प्रस्ताव असून, मुख्याध्यापकांकडून यादी बनवण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडून मुलींच्या पालकांना धनादेश दिले जावेत, असा प्रस्ताव असून सायकल खरेदीची पावती दाखवणे बंधनकारक आहे.
पावती दाखवावी लागेल
मुलींना थेट अनुदानाच्या रूपात रक्कम देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाला पाठवला आहे. त्यामुळे सायकल कोणत्या कंपनीकडून घ्यायची, कितीचे टेंडर काढायचे, हा वादच होणार नाही. फक्त मुलींना सायकल घेतल्याची पावती दाखवावी लागणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यांनतर मुलींची यादी मागवता येईल. भास्कर मुंढे, आयुक्त, मानव विकास मिशन