आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमाक्याने शिवाजी कॉलनी हादरली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरात शिवाजी कॉलनीतील जिजाबाई तुळशीराम काळवणे यांच्या घरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता गॅस सिलिंडरचा शक्तिशाली स्फोट झाला. सुदैवाने घरात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली. स्फोटात घराची पत्रे उडाली. घरापासून पाचशे मीटरपर्यंत स्फोटाचा आवाज घुमला.
स्फोटामुळे सिलिंडरचे तुकडे झाले असून फ्रिजच्या कॉम्प्रेसरचाही स्फोट झाल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सिलिंडरचे तर दोन तुकडे झाले होते. स्फोट झाला तेव्हा रिक्षाचालक असणारा काळवणे यांचा मुलगा शिवाजी हा कामानिमित्त बाहेर गेला होता व जिजाबाई शेजाºयांकडे बसल्या होत्या. राखीपौर्णिमा असल्याने त्यांची सून माहेरी गेली होती.
स्फोटामुळे जिजाबाई घाबरून गेल्या होत्या. घटनेनंतर काही काळ त्यांना बोलताही येत नव्हते. स्फोटानंतर परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील बालाजी मेडिकलचे मालक विजय तरटे यांनी सांगितले की, सायंकाळी 7 वाजता मी पूजा करत होतो. त्याच वेळी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. सुरुवातीला काही कळले नाही, परंतु काही वेळेनंतर कळले की, काळवणे यांच्या घरात सिलिंडर स्फोट झाला.
केवळ बघ्यांची गर्दी - सिलिंडर स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक काळवणे यांच्या घराकडे धावले, परंतु प्रत्यक्षात मदत करणाºयांची संख्या मात्र कमी होती. गर्दी इतकी होती की, अग्निशमन दलाच्या जवानांना स्फोट झालेल्या घरापर्यंत पोहोचणे अवघड झाले होते.