आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज टोलनाक्यावर सशस्त्र दरोडा;चार लाख लुटले, कर्मचार्‍यालाही मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाळूजलगतच्या टोलनाक्यावर आठ दरोडेखोरांनी पिस्तूल आणि तलवारीच्या धाकावर सुमारे चार लाख रुपये लुटले. हा दरोडा सोमवारी (23 सप्टेंबर) पहाटे पावणेपाचच्या सुमारास टाकण्यात आला. दरोडेखोरांनी नाक्यावरील कपाट फोडून चार लाखांची रोकड लुटली. पोलिसांची नाकाबंदी भेदून दरोडेखोरांनी रस्त्यावर सोडले आणि शेतात पसार झाले. त्यांच्या वाहनात पिस्तूल, तलवारी आणि एक लाख रुपये सापडले.

वाळूजपासून पश्चिमेस पुणे महामार्गावर तीन किमीवर केटी संगम कन्स्ट्रक्शन्सचा टोलनाका आहे. नाक्यावरील चारही बूथच्या सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. नाक्यापासून शंभर फुटांवर एका खोलीत कॅश रूम, कार्यालय तर दुसर्‍या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा हाताळणीसाठी डीव्हीआर बॉक्स बसवण्यात आला आहे. टोलनाक्याच्या कार्यालयात नाका प्रभारी प्रशांत मुगटकर (32), लेखापाल विजय सिंग (28), संजय स्वामी (33) व शंकर हिंगणे (24) हे कर्मचारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास कार्यरत होते. त्याचवेळी आठ दरोडेखोर कार्यालयाच्या उघड्या दारातून आत शिरले. त्यांच्या हातात तलवारी, खंजीर व पिस्तूल होते. क ाही कळायच्या आत त्यांनी सर्वांना ‘शांत बसा, क ोणीही बोलू नका, नाहीतर येथेच आडवे क रू’ असे धमकावत प्रशांत मुगटकर यांच्या कानशिलास पिस्तूल लावले. त्यानंतर इतर दरोडेखोरांनी तिजोरी व कपाट फ ोडले. त्यातील चार लाख रुपये काढून घेतले. दरोडेखोर आपसात हिंदी व मराठीत बोलून आरामाने काम करा असे खुणावत होते. काही दरोडेखोर त्यांच्या एका साथीदाराला ‘अस्लम’ नावाने हाक मारत होते. मोठय़ा प्रयत्नाने तिजोरी फोडल्यानंतर त्यात काही न सापडल्याने दरोडेखोरांनी चिडून मुगटकर यांच्या कानशिलात दोन चापटा मारल्या. तेथील संगणकही फोडले. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी केली. वाळूज पोलिसांनी प्रशांत मुगटकर यांच्या तक्रारीवरून 3 लाख 94 हजार 941 रुपये लुटल्याचा गुन्हा नोंदवला.

दरोडेखोरांशी पोलिसांची झुंज
गस्त वाढवण्याच्या आदेशानंतर सिल्लेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाशकुमार पाटील, उपनिरीक्षक अशोक पवार यांनी यंत्रणा सज्ज केली. सहायक उपनिरीक्षक येडुसिंग महेर, पोलिस नाईक विजयसिंग खोकड व अन्य दोघांनी नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात बॅरीकेट लावून नाकेबंदी केली. त्याचवेळी सुसाट तवेरा त्यांच्या दिशेने आली. कार खोकड यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जीवाची पर्वा न करता त्यांनी चालकाचा शर्ट पकडला. गाडीने हुल देताच ते खाली पडले व दरोडेखोर पसार झाले.

अंधाराचा फायदा घेऊन पसार
पाच वाजता वाळूज पोलिसांना दूरध्वनीवरून दरोड्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. रणवीरकर, लक्ष्मण तारक व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक किशोर नवले पथकासह हजर झाले. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. तेव्हा दरोडेखोर तवेरा कारमधून नगर-औरंगाबाद महामार्ग सोडून लिंबेजळगावपासून वळण घेऊन तुर्काबादकडे निघाले. वायरलेस सेटवरून पोलिसांनी एमआयडीसी तसेच सिल्लेगाव पोलिसांना याची माहिती दिली. घाणेगाव मार्गाने पोलिस उपनिरीक्षक अनिल कुरुंदकर निघाले होते, तर लासूर नाक्यावर सिल्लेगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. के. पाटील फौजफाट्यासह सापळा लावून तैनात होते. लासूर नाक्यावर पोलिस वाहन पाहून भरधाव तवेरा थांबली. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर तवेरा रस्त्यावरच सोडून करंजगाव शिवारात पळाले.

सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद
अवघ्या 15 मिनिटांत हा दरोडा टाकला गेला. मात्र, अध्रे काम होईपर्यंत कार्यालयातील तसेच बाहेरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याने दरोडेखोरांच्या सर्व हालचाली टिपल्या गेल्या. पुरावा मागे राहू नये म्हणून दरोडेखोराने डीव्हीआर बॉक्सही लंपास केला होता, परंतु क ार सोडून पळताना डीव्हीआर बॉक्स कारमध्येच राहिल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. त्यातील चित्रीकरण बघितले असता सर्व दरोडेखोर पाठीमागून येऊन कार्यालयात शिरताना व तेथील वस्तू हाताळताना स्पष्ट दिसत आहेत. एक दरोडेखोर एका पायाने लंगडा असून तो हातात अँल्युमिनियमची काठी घेऊन होता. ठसेतज्ज्ञ तथा सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. बिरुटे यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते.

चेहरे लपवून आले दरोडेखोर
20 ते 30 वर्षे वयोगटातील दरोडेखोर हातात तलवारी, खंजीर व पिस्तूल घेऊन आले होते. स्वत:ची ओळख लपवण्याची दरोडेखोरांनी क ाळजी घेतली. सर्वांनी हातरुमालाने तोंड बांधले होते. अंगात टी शर्ट तसेच ज्ॉकेट, थंडीपासून बचाव करणार्‍या टोप्या घातल्या. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बघून चित्रीकरण थांबवण्यासाठी कार्यालयातील सर्व लाइट बंद केले व कपाट, तिजोरी फोडली. एकाने कार्यालयाशेजारील खोलीतून डीव्हीआर बॉक्स क ाढून घेत पळ काढला.