आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन कोटींचा धनी, तरीही वासुदेव दारोदारी, अर्धा महाराष्ट्र केला पादाक्रांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गरिबीमुळे अनेक जण बहुरूपी, पोतराज, गोंधळी, वाघ्या-मुरळी किंवा अन्य पारंपरिक लोककला जोपासून आपला चरितार्थ चालवतात. परंतु कोट्यवधी रुपयांचा जमीनजुमला असतानाही केवळ लोककलेची जपणूक व्हावी यासाठी वासुदेव बनून राज्यातील अनेक शहरे पादाक्रांत करणारा दादा विठ्ठल वाकुडे (21) याच्यासारखे कलावंत विरळच सापडतील. लहानपणीच त्याला या कलेची आवड निर्माण झाली आणि गेल्या अकरा वर्षांपासून तो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत वासुदेव बनून फिरत आहे. प्रात:काली पहाडी आवाजात "हरिनाम बोला, वासुदेव आला' हे स्वरचित गीत गात तो दारोदारी फिरतो. कुणी दान दिले तरच तो स्वीकारतो. संगीतकार अजय-अतुल यांनीही दादाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
मूळचा बारामती तालुक्यातील जोळची येथील रहिवासी असलेला दादा वाकुडे याला गोड गळ्याची देणगी लाभली आहे. पहिलीपासूनच त्याने शिक्षणाला रामराम करून रामनाम जपण्यात धन्यता मानली. अजोबा कोंडिबा वाकुडे हे वासुदेव साकारायचे. त्यांचे बोट धरून दादा त्यांच्यासमवेत फिरत होता. त्यामुळे त्याला शिक्षणाची गोडी लागलीच नाही. दादाने सांगितल्यानुसार वाकुडे कुटुंबाकडे वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन आहे. या शेतीची आजघडीला ३ कोटी रुपये किंमत आहे. वडिलांनी त्याला हे खूळ सोडून शेती कर, असे सांगितले. मात्र पणजोबापासूनची कला का सोडायची, यावर दादा अडून बसला आहे.
अजय-अतुल यांची कौतुकाची थाप
हरिनाम बोला, वासुदेव आला,
रामपारी वासुदेवाची आली फेरी,
सीता-सावित्री दान करी

हे स्वरचित गीत उंच आणि गोड आवाजात गाऊन तो अनेकांना आकर्षित करतो. पुण्यात पहाटे हे गीत गात फिरत असताना प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी झोपेतून उठत रस्त्यावर येऊन त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, असे दादा वाकुडे अभिमानाने सांगतो. केवळ देवीदेवतांची गीते नव्हे, तर कानाला मधुर वाटणारी, मनाला शांती देणारी गाणी गायला आवडतात, असे तो सांगतो.
औरंगाबादचे लोक आळशी!
अर्धा महाराष्ट्र हिंडून आलेला दादा वाकुडे दोनच दिवसांपूर्वी आणि पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आला. दोन दिवसांपासून पहाटे शहरात फिरत असताना लोक मात्र झोपेतून उठून दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. येथील लोक आळशी दिसतात. पण जे कोणी मला भेटले ती माणसे चांगली होती, असे मतही त्याने व्यक्त केले. दररोज पहाटे 4 किमी पायी फिरत असल्याचेही त्याने सांगितले.