आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दहीहंडीत गोविंदा १८ वर्षांचाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहीहंडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या निर्णयाचीच यंदा अंमलबजावणी होणार आहे. हंडी फोडण्यासाठी येणाऱ्या पथकातील गोविंदा १८ वर्षांचाच किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा असेल, असे पोलिस उपायुक्त संदीप आटुळे यांनी सोमवारी (दहा ऑगस्ट) स्पष्ट केले. गेल्या वेळी न्यायालयाचा अादेश असूनही ऐनवेळी १२ वर्षांचे गोविंदा हंडी फोडण्यासाठी आणले गेले होते. यंदा तसा प्रकार चालणार नाही, असेही आटोळे म्हणाले.

सहा सप्टेंबर रोजी दहीहंडी महोत्सव आहे. या महोत्सवाला अलीकडील काळात इव्हेंटचे रूप प्राप्त झाले असून त्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत. आताही सुमारे २० गोविंदा पथकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. १२ वर्षांखालील गोविंदाही सराव करत आहेत. ४० पेक्षा अधिक ठिकाणी दहीहंडी लागण्याची शक्यता आहे. काही पथकांच्या प्रमुखांकडे विचारणा केली असता त्यांनी राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश, धोरण जाहीर झालेले नाही. त्यामुळे १२ वर्षांखालील गोविंदांचा समावेश करत असल्याचे सांगितले. त्यामुळे‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने आटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच (२७ ऑक्टोबर २०१४ रोजी न्यायमूर्ती अनित आर. दवे, कुरियन जोसेफ, आर. के. अग्रवाल यांनी अंतिम निर्णय दिला होता.) अंमलबजावणी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पथकांनी तयारी करावी. दहीहंडीचा थर २० फुटांपेक्षा उंच असू नये. गोविंदाचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल, याची काळजी घ्यावी. नवीन आदेश, निर्देश आले तर ते गोविंदा पथकांना कळवले जातील. गणेश मंडळांचे मंडप रस्त्यावर असू नयेत, असाही निर्णय झाला आहे. यंदा औरंगपुरा येथे रस्त्यावर लागणारी राखी विक्रीची दुकाने जिल्हा परिषदेच्या मैदानावर लागतील, असेही ते म्हणाले.
पोलिसांच्या निर्धाराला गोविंदांचा पाठिंबा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच अंमलबजावणी करण्याचा पोलिसांचा निर्धार असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे. आता गोविंदा पथक प्रमुख आणि दहीहंडी महोत्सव आयोजकांची बैठक पोलिस आयुक्तांनी घेऊन सर्व नियम, अटींची माहिती द्यावी. किशोर तुळशीबागवाले, जबरेहनुमान गोविंदा पथक प्रमुख

१. गोविंदांचे वय १२ वर्षांहून १८ वर्षांपर्यंत न्यावे.
२. दहीहंडीचा थर २० फुटांपेक्षा उंच असू नये.
३. आयोजकांनी १५ दिवस आधी महोत्सवाची परवानगी घ्यावी.
४. गोविंदाचा फोटो आणि वयाचा दाखला सादर करावा.