आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील लुंगी डान्सचा गोविंदांवर प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रांतीय अभिनिवेश बाजूला सारून नृत्य आणि संगीत कशी जनमनावर जादू करते याचा प्रत्यय आज (29 रोजी) आला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातील लुंगी डान्स हे गाणे लयबद्ध, ठुमकेदार संगीतामुळे यंदा सर्वत्र धूम करीत आहे. गोप-गोपिकांचे शृंगारगीत-नृत्याला फाटा देत गोविंदांनी ‘ऑल द रजनी फॅन्स.. डोंट मिस द चान्स..’ असे गुणगुणत तुफान नृत्य केले. शहरातील बहुसंख्य दहीहंडी नृत्यात लुंगी नृत्याची धमाल दिसली.

मुंबईच्या गोविंदा पथकाच्या बरोबरीने अवघ्या तीन मिनिटांत सात थर लावून औरंगाबादकरांनी अभिमान बाळगण्याची संधी गोविंदा पथकांनी गमावली नाही. या उत्सवात बक्षीस आणि आयोजनावर सुमारे एक कोटी रुपये खर्च झाला. जाधव मंडीतील जबरे हुनमान मंडळाने सात थर लावून विक्रमी कामगिरी केली. युगंधर, स्वाभिमान दहीहंडीत या पथकाने सात थर लावले. यापाठोपाठ जय भोले, राजाबाजार, रणयोद्धा, वीर बलराम, र्शीकृष्ण, जयभद्रा, हरिओम, बेगमपुरा या पथकाने सहा थर लावून सलामी दिली. डीजेच्या तालावर नाचणारी बेधुंद तरुणाई हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. शहरातील औरंगपुरा, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, कोकणवाडी, बजरंग चौक, निराला बाजार आदी चौकांत आयोजकांनी भव्य दिव्य व्यासपीठ उभारून या महोत्सवाचे आयोजन केले होते. नऊ-दहा थरांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर हंड्या सात थरांपर्यंत खाली आणल्या होत्या.

अमृता खानविलकरवर भिरकावली चप्पल
युगंधर दहीहंडी महोत्सवात सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर हिचे ‘वाजले की बारा’ या लावणीवर नृत्य सुरू असताना समोर असलेल्या प्रेक्षकांमधून तिच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ संशयिताला पकडले. जमावानेही त्याला बेदम चोप दिला.

अकरा दहीहंड्यांत 22 पथके
राजाबाजार मित्रमंडळ, शिवशक्ती क्रीडा मंडळ, धावणी मोहल्ला, जबरे हनुमान क्रीडा मंडळ, जाधवमंडी, हरिओम क्रीडा मंडळ दिवाण देवडी, जय भोले क्रीडा मंडळ चेलीपुरा, गोगानाथ क्रीडा मंडळ औरंगपुरा, जय भद्रा क्रीडा मंडळ राजाबाजार, राजकमल क्रीडा मंडळ गवळीपुरा, बेगमपुरा मित्रमंडळ, साई दयावान ग्रुप, हडको, चंद्रविलास क्रीडा मंडळ, चौराहा, वीर बलराम क्रीडा मंडळ रंगारगल्ली, रणयोद्धा मंडळ, द्वारकाधीश क्रीडा मंडळ, साई प्रतिष्ठान, नारळीबाग अशा 22 पथकांनी अकरा दहीहंड्या महोत्सवात धमाल केली.

मनसेच्या दहीहंडीत लाठीमार
गजानन महाराज मंदिर चौकात आयोजित मनसेच्या दहीहंडी महोत्सवात दोन गोविंदा पथकांचे वाद झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले. ते रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कार्यक्रम सुरळीत सुरू झाला. एक तरुण व्यासपीठाच्या बाजूला उभा असलेल्या महिलांमध्ये गेल्यामुळे हा वाद झाला असल्याचे आयोजक सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

पूजाच्या फ्लाइंग किसने सर्वच घायाळ
चित्रपट अभिनेत्री पूजा रूपारेल अश्वमेध क्रीडा मंडळाच्या दहीहंडी स्टेजवर येताच शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. तिने फ्लाइंग किस देताच तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकला. तरुणांनी लुंगी डान्सवर नाचण्याची फर्माईश करताच पूजाने नृत्यावर ठेका धरला आणि उपस्थित सर्व थिरकायला लागले.

बॉम्बशोधक पथकाची तपासणी
दहशतवादी यासीन भटकळ आणि त्याच्या साथीदाराला गुरुवारी अटक झाल्यानंतर शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दुपारी 12 वाजेपासून बॉम्बशोधक व नाशक पथकाने सर्व दहीहंडी महोत्सव स्टेजची कसून तपासणी केली. वाळूज, पदमपुरा, गुलमंडी, औरंगपुरा, निराला बाजार, कॅनॉट प्लेस आदी महोत्सवांच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. तीन वाहनांमध्ये तीन अधिकारी आणि 12 कर्मचारी या मोहिमेत होते. त्यांनी श्वान रुबी, स्टेफी आणि डॉलीच्या साहाय्याने वाळूज, हडको टीव्ही सेंटर, औरंगपुरा, पदमपुरा यासह सर्वच दहीहंडी महोत्सव साजरा करणार्‍या स्टेजची तपासणी केली. ही मोहीम सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती.