आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांच्या मुलाला लिलावात दाल मिल, जेपीसी बँकेच्या संचालक मंडळाचा प्रताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जेपीसी बँकेचा सोने तारण घोटाळा प्रकरणात ३९ संचालकांविरुद्ध  गुन्हे नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर बँकेतील अनागोंदीची नवीन प्रकरणे समोर येत आहेत.  एका प्रकरणात बँकेने २००१ मध्ये तीन वर्षांच्या बालकाला लिलावात दालमिल बहाल केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तत्कालीन संचालक मंडळाच्या नातेवाइकाला ही दाल मिल देण्यात आली. 
 
जालन्याच्या जुन्या औद्योगिक वसाहतीतील अंबिका पल्स मिल अवसायनात  निघाल्यावर मिलवरील कर्जापोटी बँकेने लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली. त्यानंतर ६ ऑक्टोबर २००० रोजी याच मिलच्या आवारात लिलाव झाला. यात महेश भक्कड, कुंदनलाल काठोटीवाल व उमंग पुरुषोत्तम पंच या तिघांनी सहभाग घेतला. त्यात उमंग पुरुषोत्तम पंच यांची बोली सर्वाधिक किमतीची ठरल्याने त्यांना ही मिल देण्यात आली. उमंग पंच याची जन्म तारीख २ मे १९९७ असून लिलावाच्या वेळी तो केवळ तीन वर्षाचा होता अशी माहिती समोर आली आहे. 

तीन वर्षाच्या मुलाने स्वत: बोलीत सहभाग घेतला का? का त्याच्या वतीने अन्य कुणी बोली लावली याची माहिती बँकेने दिली नाही. ज्या उमंग पंच यास ही मिल दिली तो बँकेच्या तत्कालीन संचालकाचा पुतण्या होता अशी माहिती सूत्रांनी दिली. बँकेच्या तत्कालीन संचालकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन या लिलाव प्रक्रियेत वजन वापरल्याचे सांगितले जात आहे.  हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे या प्रकरणातील तक्रारदार तथा बँकेचे माजी संचालक सुनील लाहोटी यांनी म्हटले आहे.
 
त्यांनी बँकेच्या संचालक मंडळावर असतानाच यासंदर्भात इत्यंभूत माहिती घेतली.सर्व नियम धाब्यावर बसवून ही लिलाव प्रक्रीया राबविण्यात आल्याने बँकेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही अनधिकृत प्रक्रीया रद्द ठरविण्यात यावी व ही मालमत्ता बँकेकडे जमा करण्यात यावी. यासंदर्भातील कागदपत्रे गोळा करण्यासाठी मी थांबलो होतो. त्यामुळे आपण आता न्यायालयात जाणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा माजी संचालक जेपीसी सुनिल लाहोटी यांनी सांगीतले. 
 
व्यवहार संशयास्पद  
उमंग पंच याने साडेबारा लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावून ही मिल घेतली. त्यासाठी त्याने लिलावात भाग घेण्यासाठी १० हजार रुपये भरले होते. उर्वरित रक्कम दोन धनादेशाद्वारे अंबिका पल्स मिलच्या खात्यावर भरली. तेथून ही रक्कम जेपीसी बँकेच्या खात्यावर जमा केली. मात्र ज्याने लिलावात ही मिल मिळवली त्याच्या किंवा त्याच्या पालकाच्या खात्यावरून जेपीसीच्या खात्यावर ही रक्कम जमा होणे आवश्यक होते मात्र या व्यवहारात तसे झाले नाही. 

अज्ञान बालक भाग घेऊ शकत नाही 
लिलावात अज्ञान बालक भाग घेऊ शकत नाही. मात्र, त्याच्या वतीने त्याचे पालक बोली लावू शकतात, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.अंबिका मिलच्या लिलाव प्रक्रियेत उमंग पंच या तीनवर्षीय मुलानेच बोली लावली होती. बँकेने माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या माहितीत हे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...