आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांना दलितांसारखे अारक्षण हवे : शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील मुस्लिमांची अवस्था आदिवासी दलितांसारखीच आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी एमजीएमच्या मैदानावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी ही भूमिका मांडली. मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण हवे, अशी मागणी आधीच्या वक्त्यांनी केली होती. त्यावर पवार यांनी या समाजाला तिन्हीही गोष्टींची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, देशाच्या विकासात मुस्लिमांचाही सहभाग आहे.
मागास समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्यासाठी आरक्षण दिले जाते. आदिवासी आणि दलितांना हे आरक्षण दिले गेले आहे. मुस्लिम समाजाचीही आर्थिक आणि सामाजिक परिस्थीती त्यांच्या सारखीच आहे. त्यामुळे या समाजालाही आरक्षण दिले गेले पाहिजे. औरंगाबादविषयी ते म्हणाले, की हे वेगळे शहर आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक सोबत काम करत शहराचा विकास करतात. धर्मनिरपेक्षता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी मंत्री फौजिया खान, राजेश टोपे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलीक, कदीर मौलाना, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरजितसिंग खुंगर, अनुसूचित जाती सेलचे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, कमाल फारुकी, मधुकर अण्णा मुळे, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची उपस्थिती होती. आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आभार मानले.

पावसासाठी प्रार्थना
गेल्याचार वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यासह देशभरात जोरदार, मुबलक पाऊस व्हावा यासाठी नमाज अदा करताना पावसासाठी प्रार्थना करावी, अशी सूचना हाफीज अब्दुल्ला यांनी केली. त्यानुसार प्रार्थना करण्यात आली.

‘मुस्लिममुक्त भारत’ म्हणणाऱ्यांपासून मुक्ती हवी
अल्पसंख्याकसेलचे अध्यक्ष गफार मलिक यांनी काही जणांकडून ‘मुस्लिममुक्त भारत’ करण्याचा प्रयत्न चालला असल्याचे सांगितले. याचा धागा पकडून पवार म्हणाले, ‘मला जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हाच मी म्हणालो होतो की, असे म्हणणाऱ्यांना पागलखान्यात पाठवले पाहिजे.’ हा देश कोणाच्या बापाचा नाही. येथे सर्व धर्मांचे लोक समान हक्काने राहतात. ‘मुस्लिममुक्त भारत’ म्हणणाऱ्या लोकांपासूनच देशाला मुक्ती हवी आहे.
बातम्या आणखी आहेत...