कन्नड - तालुक्यातील देवपूळ येथील उमेश आगळे या 20 वर्षीय दलित युवकाचा 25 एप्रिल रोजी खून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयास बुधवारी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी 3 लाख 75 हजार रुपयांची मदत दिली. तसेच दलित समाजाच्या वतीने 1 लाख रुपयांची मदत
करण्यात आली.
25 एप्रिल रोजी देवपूळ येथील उमेश आगळे या युवकाच्या घरी त्याचे चार मित्र आले होते. गप्पा मारण्यासाठी त्याला घेऊन गेले. मात्र, दुसर्या दिवशी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यावरून कैलास काळे, पांडुरंग घुगे, गणेश पवार, सागर पवार यांच्याविरोधात विविध संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पिशोर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात उमेश याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी मारहाण करून प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केला होता.
दोषीवर कारवाई करणार : मोघे
महाराष्टÑ हे पुरोगामी राज्य असून येथे शहरापासून ते अगदी खेड्यापाड्यांपर्यंत सर्व जाती, धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. अशा परिस्थितीत उमेश आगळे याच्याबाबत घडलेली घटना दुर्दैवी असून ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु या प्रकरणात पोलिसांनी उमेशच्या कुटुंबीयांना मारहाण करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. ही बाब दुर्दैवी असून दोषीविरुद्ध कारवाई करणार असल्याचे या वेळी शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.दरम्यान, एवढे गंभीर प्रकरण असताना पिशोर पोलिसांनी आगळे कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रकार केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. मृत उमेश आगळे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पावणेचार लाखांचा धनादेश दिला. तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी आगळे कुटुंबास एक लाख रुपयांचा धनादेश देत सांत्वन केले. बुलाडाणा येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे या वेळी उपस्थित होते.