आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठच्या खरिपाच्या पिकांचे पंचनामे झाले सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नाशिकमधील विविध सिंचन प्रकल्पांतून गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या वैजापूरमधील १७ व गंगापूर तालुक्यातील १३ गावांतील शेतशिवारातील खरीप हंगामातील पिकांना त्याचा जबर फटका बसला आहे. वैजापूर तालुक्याच्या १७ गावांतील सुमारे २ हजार हेक्टर, तर गंगापूर तालुक्यातील ९ गावांतील ६६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज कृषी विभागाने महसूल प्रशासनाकडे एका अहवालाद्वारे वर्तवला आहे. दरम्यान, महसूल प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकाला शेतातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासनाने बजावले आहेत. नाशिक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने तेथील सर्व धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाला होता. त्यामुळे या धरणातील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात नांदूर मधमेश्वर पिकअपवेअर धरणाद्वारे गोदावरी नदीतून सोडण्यात आले होते. मंगळवारी रात्री नदीपात्रात अचानक विसर्गात झपाट्याने वाढ झाल्याने गोदावरीला महापूर आला होता. त्याचा फटका वैजापूर तालुक्यातील १७, तर गंगापूर तालुक्यातील १३ गावांना बसला होता. तालुक्यातील ८ गावांचा संपर्क तुटला होता, तर या दोन्ही तालुक्यांतील शेकडो हेक्टर क्षेत्राला पुराच्या तडाख्यात सापडले होते. सावखेडगंगा, नांदूरढोक आदी ठिकाणी, तर नदीने प्रवाह बदलल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेली होती. नदीकाठच्या गावांमध्ये एकीकडे पुराचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे, तर दुसरीकडे काही घरांचीही पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने गोदावरीचा पूर ओसरू लागला होता. सध्या गोदावरी तिच्या पात्रातून वाहत आहे. या पुरात गोदाकाठच्या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने बजावले आहेत.

त्यानुसार तहसील कार्यालयाने तालुक्यातील १७ गावांमध्ये २ तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
२ हजार ६६४ हेक्टरचे नुकसान
वैजापूर तालुक्यातील १७ गावांतील सुमारे २ हजार हेक्टर, तर गंगापूर तालुक्यातील ९ गावांतील ६६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यातील ३ गावांच्या संपादित क्षेत्रातच पाणी असल्याचा नजर अंदाज कळवला आहे. या नजर अंदाजानुसार वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा २१०, नांदूरढोक ९०, बाभूळगावगंगा २२५, बाबतारा २०५, डोणगाव २२२, लाखगंगा १२४, पुरणगाव २४०, वांजरगाव १९०, भालगाव १४९, डागपिंपळगाव १०५, नागमठाण १३२, चांदेगाव १४, बाजाठाण २०, अव्वलगाव १७, हमरापूर १९, देवगाव शनी १४ व चेंडूफळ १८ असे एकूण १९९५ हेक्टर, तर गंगापूर तालुक्यातील नेवरगाव ३००, हैबतपूर २००, बगडी १७, ममदापूर १९, अगरकानडगाव २८, जामगाव १०० असे ६६४ हेक्टरवरील नुकसान झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...