आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींनो, सावधानतेने राहा, निर्भीड बना; दामिनी पथकाच्या अरुणा घुले यांचा तरुणींना सल्‍ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुणाचेही गैरवर्तन, अत्याचार निमूटपणे सहन करणे खूपच घातक आहे. त्यामुळे निर्भीड बना, सावधानतेने वागा, असा सल्ला दामिनी पथकाच्या प्रमुख अरुणा घुले यांनी दिला. एमजीएम तंत्रनिकेतनमध्ये आयोजित महिला सुरक्षितता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमजीएम तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील होते. 

इयत्ता नववीतील एका विद्यार्थिनीने गेल्या महिन्यात छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची गंभीर दखल घेत ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन ‘माझं शहर सुरक्षित शहर’ या अभियानाची सुरुवात केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत एमआयटी महाविद्यालयात मुलींसाठी पहिल्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षक भारती या शिक्षक संघटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला. त्यापाठोपाठ एमजीएम तंत्रनिकेतन महाविद्यालयातही मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
या वेळी घुले म्हणाल्या की, एखाद्या अनोळखी अथवा ओळखीची व्यक्ती तसेच नातेवाईक, पालक, मित्र किंवा शिक्षक, सहकारी कर्मचारी, वरिष्ठ, शेजाऱ्यांकडून आपल्यासोबत गैरवर्तन होत असेल, तर तुम्ही तत्काळ सावध होणे आवश्यक आहे. गैरवर्तनाची सुरुवात होत आहे असे वाटले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. निर्भीड व्हा आणि पोलिसांकडे तक्रार करा. महिला मुलींनी आपल्या पालकांची दिशाभूल करून परस्पर मित्र-मैत्रिणींसोबत एकांताच्या ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळा. प्रलोभन, लग्नाचे आमिष यासारख्या गोष्टींना बळी पडू नका. 

सार्वजनिक ठिकाणी आपले कान डोळे नेहमी सतर्क ठेवा. कोणत्याही संकटसमयी प्रत्येकास मदत करा. या प्रकाराशी आपला काय संबंध, असे म्हणत बघ्याची भूमिका घेऊ नका. घरात एकटे असताना खात्री करून मगच शक्यताे दरवाजा उघडावा. घरी असताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देणे टाळा. दूधवाला, पेपरवाला किंवा सेल्समन यांनाही शक्यतो घरात येऊ देऊ नका. आपल्यासोबत पेपर स्प्रे, मिरची पावडर अवश्य बाळगा, असेही त्या म्हणाल्या. वुमेन्स सेलच्या प्रमुख प्रा. सारिका राठी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्नाली काळे यांनी आभार मानले. या वेळी प्रा. चेतना भगत, प्रा. अमृता जाधव, प्रा. मेघा अहंकारी, प्रा. चैतन्या घटोळ, प्रा. मेघा शिंदे, प्रा. प्रज्ञा नारनवरे, प्रा. सुजाता मोरे, प्रा. संपदा लोमटे, प्रा. प्रणिता सुकळकर उपस्थित होत्या.
बातम्या आणखी आहेत...