आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धनारीनटेश्वराची ओडिसी नृत्यप्रकारातून अप्रतिम प्रस्तुती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय नृत्यकलेचा वारसा जपण्यासोबतच पर्यटकांना याची ओळख करून देण्यासाठी आयोजित औरा औरंगाबाद नृत्यखलेचे १३ वे पुष्प शुक्रवारी गुंफण्यात आले. अनू नारायण आणि डॉ. संगीथा राजन या डेबी बासू यांच्या शिष्यांनी ओडिसी नृत्याची अप्रतिम प्रस्तुती केली. अर्धनारीनटेश्वराचे अभिनयाने परिपूर्ण नृत्य रोमांचित करणारे ठरले.

महागामीच्या शारंगदेव सभागृहात हे नृत्य सादरीकरण झाले. या वेळी रसिक प्रेक्षक, पर्यटकांची उपस्थिती होती. सीआयआय आणि महागामीच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महागामी संचालिका पार्वती दत्ता यांच्या नियोजनात हे पुष्प गुंफण्यात आले आहे. घुंगरांच्या मंजूळ आवाजाने दोन्ही नृत्यांगनांनी रंगमंचावर हळूवारपणे प्रवेश केला. पारंपरिक वेशभूषा आणि रंगभूषेत त्यांनी मंचाचा ताबा घेतला. सिमहेंद्र पल्लवी या ओडिसीच्या पारंपरिक नृत्य प्रकाराने त्यांनी सादरीकरणाची सुरुवात केली. संपूर्ण आनंदानुभव देणारे हे शुद्ध नर्तन दाखवताना नृत्यांगनांनी सुरेख संगम साधला. तालबद्ध नृत्यातून अभिनयाचीही चित्तवेधक अदाकारी त्यांनी केली. शिल्पांमध्ये बहुसंख्य वेळा आढळणाऱ्या पदमुद्रा आणि हस्तमुद्रांचा मिलाफ यामध्ये नृत्यांगनांनी कौशल्याने दाखवला.
साभिनया या दुसऱ्या प्रस्तुतीत नृत्यांगनांनी एक कथा दाखवली. भगवान श्रीकृष्णाला पहिल्यांदा पाहिलेल्या खेड्यातील एका मुलीने आपल्या मैत्रिणीकडे केलेले हे वर्णन होते. चपळाईपूर्ण, लचकदार नृत्य करताना नृत्यांगनांनी कृष्णलीला सर्वांपुढे उभी केली.
सादरीकरणाला शेवटाकडे नेताना अर्धनारीनटेश्वरा प्रस्तुती रागा मालिकेवर आधारलेली होती. लास्य आणि तांडव यांचा मिलाफ असलेले हे नृत्य रोमांचित करणारे ठरले. दोन विरुद्ध प्रकृती शिव आणि पार्वती यांचे अतिशय तालबद्ध असे हे नृत्य होते.