आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dangat Today Incharge Of Divisional Commissioner

खास मुलाखत: १९७ २ चा दुष्काळ अनुभवलेले दांगट आजपासून विभागीय आयुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील सर्वात भीषण दुष्काळ म्हणून १९७२ च्या दुष्काळाची नोंद होते. याच दुष्काळाचा अनुभव असलेले प्रशासकीय अधिकारी उमाकांत दांगट उद्यापासून (बुधवार) मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारत आहेत. येत्या पाच वर्षांत पर्जन्यमान कमी झाले, तरी मराठवाड्यात दुष्काळ जाणवणार नाही, असे काम करण्यासाठी मी विभागीय आयुक्त म्हणून येतोय. त्यासाठी जलयुक्त शिवार, शिरपूर पॅटर्न तसेच लहान-मोठ्या सर्व गोष्टी केल्या जातील, असे दांगट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

दांगट बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारणार आहेत. त्यापूर्वी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला. दुष्काळ काय असतो, याची जाणीव दांगट यांना आहे. त्यामुळेच भविष्यात कमी पाऊस झाला तरी टंचाई जाणवणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार ही योजना कृषी आयुक्त या नात्याने त्यांनी शासनासमोर ठेवली होती त्याची पूर्णत: अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत कितीही पाऊस कमी झाला तरी प्रत्येकाला पाणी मिळालेच पाहिजे, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आमचे काम आहे. ते केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. १९९७ ते १९९९ या कालावधीत ते याच विभागीय आयुक्तालयात महसूल उपायुक्त होते. मराठवाड्याचे भूमिपुत्र असल्यामुळे या परिसराची त्यांना सर्व माहिती आहे.

दुष्काळ स्वनयनी बघितला
दांगट हे बीड जिल्ह्यातील केज येथील रहिवासी आहेत. १९७२ ला दुष्काळ पडला, तेव्हा चार किलोमीटरवरून पाणी आणण्याचे काम त्यांना करावे लागले. दुष्काळाची तीव्रता त्यांनी जवळून अनुभवली. त्यामुळे भविष्यात दुष्काळ पडू नये यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले, १९७२ ला पाण्याची चणचण नव्हती. मात्र, खायला अन्न नव्हते. या वेळी विपरीत आहे. खाण्याची वानवा नाही, पण पाण्याची टंचाई आहे. यातून मार्ग काढण्यासाठीच या पदाचा वापर केला जाईल.

अन‌् त्यांनी लपवले वय
१९७२ मध्ये तुमचे वय किती होते, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले नाही. मला आता आठवत नाही, आठवले तरी का सांगू असे म्हणत त्यांनी तेव्हाचे वय सांगण्यास नकार दिला. दांगट हे दोन वर्षांनी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. ७२ च्या दुष्काळाला आता ४२ वर्षे झाली. त्यामुळे दुष्काळात ते १६ वर्षांचे असतील अंदाज बांधता येतो, परंतु त्यांनी वय सांगण्यास नकार दिला.