आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाई भागात बांधकाम नियम धाब्यावर, ड्रायव्हर, नोकरांच्या नावे होताहेत करार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नगरपालिकेत रूपांतर झालेल्या सातारा-देवळाई परिसरात अनधिकृत बांधकाम प्रचंड फोफावले आहे. कायदेशीर मान्यतेला मूठमाती देऊन जुन्या रेखांकनांचा आधार घेत ग्रामपंचायत क्षेत्रातील (एनए 47 (ब), एनए 45) रेखांकनांवर धोकादायक इमारती उभारल्या जात आहेत. विशेष म्हणजे ड्रायव्हर, नोकरांच्या नावे सर्रासपणे विकास करार आणि मुखत्यारपत्रे (जीपीए) केली जात आहेत.
अत्यंत कमी जागेत जास्तीत जास्त फ्लॅटची निर्मिती करून ते स्वस्तात विकून ग्राहकांना फसवले जात आहे. हा गोरखधंदा रोखण्यासाठी शासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे. सातारा व देवळाई परिसरात अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून पाचशेवर छोट्या-मोठ्या गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे.

सातारा-देवळाईत ग्रामपंचायतीचा शिक्का मारून 4 ते 5 एवढा एफएसआय मंजूर असलेले नकाशे जुन्या मालकाच्या नावाने मागील तारखेला मंजूर केलेले दाखवले जात आहेत. शहरात कुठलीही विकास यंत्रणा रेखांकन झालेल्या प्लॉटसाठी 0.75 ते 1 इतके चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देते. असे असताना सातारा- देवळाईत मात्र 4 ते 5 इतका एफएसआय कसा दिला जात आहे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईच्या कॅम्पाकोलापेक्षाही भयंकर प्रकरणे परिसरात सुरू असल्याची चर्चा आहे.
असा सुरू आहे गोरखधंदा
नागरिक घर खरेदीसाठी आल्यानंतर झेरॉक्स केलेले विक्री आराखडे त्यांना दाखवले जातात. प्रकल्पाच्या कायदेशीर कागदपत्रांची मागणी केल्यावर पक्की नोंदणी केल्यानंतर कर्ज प्रकरणाच्या वेळी संबंधित कागदपत्रे देऊ, असे सांगितले जाते. नामांकित बँक कर्ज देत नसल्याने वित्त संस्था अथवा खासगी बँकांकडून वित्तपुरवठा केला जातो. अशा अपार्टमेंटचे आरेखन नियोजन आरेखकाकडून केले जाते. वास्तु विशारद अथवा अभियंते ही कामे करत नाहीत.

घर घेताना हे तपासा विक्री करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक. जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे. वकिलाच्या सहीचा जागेच्या मालकी हक्काचा वीस वर्षांचा सर्च रिपोर्ट.
महसूल, नगररचना विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याच्या नियमावलीसह परवानग्या.
प्लॅट एन ए-44 असावा. बांधकाम परवानगी सिडको, नगर परिषदेची असावी.
राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज द्यावे, यासाठी विकासकाकडे आग्रह धरावा.
दक्षता समिती हवी
सातारा-देवळाईतील बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी अनधिकृत बांधकामविरोधी दक्षता समिती स्थापन करण्यात यावी. नोंदणी निबंधक कार्यालयात तीन हजार चौरस फूट जागेत 15 फ्लॅट बांधण्याच्या व्यवहाराची नोंद होत आहे. अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत. पापालाल गोयल, अध्यक्ष, क्रेडाई,