आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवाशांना ठेकेदार म्हणाला, तुमचीच मुले बांधून ठेवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काचीवाड्यातील"त्या' धोकादायक नाल्यात आतापर्यंत सात मुले पडून जखमी झाली आहेत. या घटनांची नोंद महापालिका अथवा ठेकेदाराने वेळीच घेतली असती तर आकाश जाधव या मुलाचा जीव वाचला असता. दोन मुले पडल्यानंतरच या भागातील नागरिकांनी नाल्यालगत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली होती. पण ठेकेदाराने भिंत बांधणे शक्य नाही, तुमची मुलेच बांधून ठेवा, असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
शहरात सात महिन्यांपासून भूमिगत गटार योजनेचे ३७० कोटी रुपयांचे काम खिल्लारी इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीतर्फे काचीवाड्यातील नाल्यात तीन महिन्यांपासून एक हजार व्यासाच्या भूमिगत गटारचे पाइप आणि चेंबर टाकण्यात येत आहे. तेव्हापासून येथील नाल्याची संरक्षक भिंत ठेकेदार आणि मनपाच्या वतीने पाइप आणि अन्य साहित्य टाकण्यासाठी तोडली होती. यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. त्यावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करण्यात येईल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे नागरिकांनी गप्प बसणेच पसंत केले. भिंत तोडल्यानंतर आठच दिवसांत पूर्ववत बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी हरकत घेतली नाही. मात्र तीन महिन्यांनंतरही ही भिंत बांधली नाही. तसेच ती पाडण्यासाठी मनपाची कोणतीच परवानगीही घेतली नाही.

दरम्यान, सात मुले या नाल्यात पडली होती. ठेकेदार मनपाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही येथे संरक्षक भिंत बांधली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रविवारी नाल्यात पडून आकाशचा मृत्यू झाला. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने ठेकेदाराला तत्काळ भिंत बांधण्याचे आदेश दिले अन् १२ तासांत भिंत उभी राहिली. हेच काम दोन दिवस अगोदर केले असते तर निष्पाप मुलाचा जीव वाचला असता, असे शिवसेनेचे बाळासाहेब थोरात, सचिन खैरे, रब्बानी शेख यांनी सांगितले. शिवसैनिकांनी सोमवारी जाधव कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

प्रशासनाच्या वतीने ठेकेदाराला नोटीस
घडलेल्या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या वतीने वरातीमागून घोडे याप्रमाणे सोमवारी ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
^ठेकेदाराला यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्याचे सुचवले होते. त्यांनी ती बांधली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाल्याजवळील जागा खेळण्याची नाही, याचे भानही नागरिकांनी ठेवावे. -अफसर सिद्दिकी, कार्यकारीअभियंता.

लोकांनी काळजी घ्यावी
^गल्लीतील मुले या नाल्यात पडत असल्याने येथे संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी आम्ही केली होती. तेव्हा ठेकेदाराने "तुमची मुले घरात बांधून टाका' अशी भाषा करत अरेरावी केली. -रुखसाना बेगम, रहिवासी,काचीवाडा

आमचा आसरा हरवला
मृत पावलेला आकाश हा ज्योती बाळकृष्ण जाधव या दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. निकिती (१३) आणि गायत्री (१०) या दोन मुलींनंतर तो झाला होता. जाधव दांपत्याने पन्नाशी पार केली असून त्यांचा भविष्याचा आसरा असलेल्या आकाशलाही काळाने हिरावून घेतला. आई अपंग असून वडील शिपाई म्हणून काम करतात. शेजाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर या दांपत्याने हंबरडा फोडला.

ही मुले वाचली
विरमशेख, समक्ष पिठोरे, हर्षदा मनोज भुईवले, अफात शेख, अब्बू हुसामा परवेज, रागीब शेख समीर आणि अन्य एक जण वाचले.