आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस-याच्या मुहूर्तावर अडीच हजार घरांत नव्या वस्तू, सोने खरेदीत शहरात 44 कोटींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दसऱ्याला सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक औरंगाबादकरांनी मोठ्या वस्तू खरेदी केल्या. आज वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सुमारे 44 कोटींची उलाढाल झाली. दस-याचा मुहूर्त दुपारनंतर असल्याने शुक्रवारी सकाळपर्यंत सामसूम असलेल्या बाजारपेठांत दुपारनंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली. अनेकांनी मुहूर्त साधण्यासाठी चारचाकी आणि दुचाकींची बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच केली होती. आज खरेदी केलेल्या वस्तूंची उत्साहात आणि भक्तिभावाने पूजा केली. शहरातील सोन्याच्या दुकानांत महिलांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या. सराफा बाजारात तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी आणि मोटार डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश झवेरी यांनी दिली, तर सुमारे 1800 दुचाकी आणि 300 चारचाकींची एकाच दिवशी विक्री झाली, तर मोबाइलचे मार्केटही उत्तम होते. अनेकांनी आप्तजनांना भेट देण्यासाठी मोबाइलची खरेदी केली, असे मोबाइल विक्रेता संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, होम थिएटर्स यांना चांगली मागणी असल्याचे अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे पंकज पाटील यांनी सांगितले.

सुरू होते आरटीओ कार्यालय
दसऱ्याच्या दिवशी गाड्यांची होणारी विक्री लक्षात घेऊन सुटी असूनदेखील आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाने यांनी दिली. आरटीओत एक कार, तर 10 ते 12 दुचाकींची पासिंग झाली. गाड्यांची संख्या लक्षात घेऊन मोटार वाहन निरीक्षकांतर्फे सुमारे 80 गाड्यांची पासिंग करण्यात आली. दसऱ्याला गाडी खरेदी केलेल्या वाहनधारकांना पुढील आठ दिवसांत नंबर मिळेल, अशी सुविधा करण्यात आली आहे.

भारतीय गाड्यांना मागणी
भारतातील रस्ते लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यातील बहुतांश ग्राहक फॅमिली कार खरेदी करणारे होते. फायनान्समुळे सामान्यांनादेखील गाडी खरेदी करणे सोयीचे झाले आहे. दिवाळीपर्यंत चारचाकी विक्रींचा आकडा हा आठशेपर्यंत जाईल व दुचाकी विक्रीची संख्या 5 हजारांपर्यंत जाईल, असे डीलर्स असोसिएशने सांगितले.