आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वेळा पटकथा लिहिल्यानंतर साकारला ‘दशक्रिया’ चित्रपट, बाबा भांड यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दशक्रिया’मधील एका दृश्यात मनोज जोशी, अदिती देशपांडे - Divya Marathi
‘दशक्रिया’मधील एका दृश्यात मनोज जोशी, अदिती देशपांडे
औरंगाबाद- २२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘दशक्रिया’ या कादंबरीचे चित्रपटरूप निर्माण करताना पटकथा लेखक, दिग्दर्शक सर्वच टीमने प्रचंड मेहनत घेतली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल आठ वेळा पटकथा लिहिली. त्यानंतर कुठे सशक्त पटकथा आकाराला आली, अशी प्रतिक्रिया ‘दशक्रिया’चे लेखक विख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी व्यक्त केली, तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे पारितोषिक पटकावणाऱ्या अभिनेता मनोज जोशी याने आतापर्यंत कधीच केली नाही अशी भूमिका करायला मिळाली त्या भूमिकेने सर्वोच्च सन्मान मिळवून दिला, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. त्यात ‘दशक्रिया’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (मनोज जोशी), सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन (संजय कृष्णाजी पाटील) असे तीन पुरस्कार जाहीर झाले. विख्यात साहित्यिक बाबा भांड यांची १९९५ मध्ये ‘दशक्रिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली. रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक करुणाजनक वाटणारे पर्याय यांचे क्लेशदायक चित्रण करणारी ही कादंबरी खूप गाजली होती. याच कादंबरीवर आधारित चित्रपट दिग्दर्शक संदीप पाटील यांनी निर्माण केला. औरंगाबादचे छायाचित्रकार किशोर निकम यांनी या चित्रपटासाठी स्थिर चित्रण हवाई चित्रीकरण केले आहे. याच चित्रपटाचा आज राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. 

याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना बाबा भांड म्हणाले की, मृत्यूच्या बाबतीत सर्वांना सन्मानाने वागवले पाहिजे; पण त्याचे स्तोम माजवू नये. सर्वच धर्मांत तशी शिकवण असताना नंतर विधी, कर्मकांड अनिष्ट बाबींचे स्तोम माजवले गेले. त्या नावाखाली पिळवणूक सुरू झाली. त्यात अडकून पडू नये, असा संदेश देताना साऱ्या बाबी ‘दशक्रिया’च्या माध्यमातून मांडता आल्या. या कादंबरीवर चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक संदीप पाटील तीन वर्षे पाठपुरावा करत होता. अखेर होकार दिला आणि हा चित्रपट निर्माण झाला. लेखक मनसोक्त लिहू शकतो, पण शब्दांना दृश्यरूपात मांडणे हे विलक्षण कौशल्याचे काम आहे. कादंबरीचा पट अडीच तासांत उलगडणे अवघड असते. 

पटकथा लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी एकदा नव्हे, तर तब्बल वेळा पटकथा लिहिली. या चित्रपटाचा शेवट त्यांनी माझ्यापेक्षाही अधिक चांगला केला आहे. अतिशय ताकदीची पटकथा तयार झाल्यानंतर दिग्दर्शक संदीप पाटील इतर सर्वच टीमने अतिशय मेहनत घेऊन चित्रपट बनवला आहे. राष्ट्रीय स्तरावर ‘दशक्रिया’ला सामाजिक आशय श्रेणीत पुरस्कार मिळेल असे वाटले होते; पण सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याने अतिव आनंद झाला. 

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याचा अानंद व्यक्त करताना अभिनेता मनोज जोशी याने स्वप्न साकारल्याची भावना व्यक्त केली. तो म्हणाला की, माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा अनुभव अवर्णनीय आहे. बातमी कळाली आणि मी स्तब्ध झालो. बाबा भांड यांची कादंबरी ताकदवान आहे आणि मी आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका केल्या, त्यात अशा प्रकारची भूमिका कधीच केली नव्हती. त्यामुळे आव्हानात्मक भूमिका करताना मेहनत घ्यावी लागली. त्याचे सार्थक झाले. 

पटकथा लेखक संजय कृष्णाजी पाटील म्हणाले की, बाबा भांड यांच्या कादंबरीत चित्रपटमूल्य भरपूर होते. ते सूत्रबद्ध बांधणे हे काम मला करावे लागले. कथा अतिशय ताकदीची असल्याने पटकथेवर काम करताना खूप आव्हानात्मक वाटले. त्या परिश्रमाचे चीज झाले. 
बातम्या आणखी आहेत...