आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही वार्डांत वाटोळ्याचा प्रचार की प्रचाराचे वाटोळे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्हाचा पारा अन् प्रचाराची धार दिवसेंदिवस वाढत असून या आठवड्यात दोन्हीही गोष्टी अधिक तीव्र होतील, यात शंका नाही. पारा चाळिशीच्या पुढे गेल्याने उमेदवार, त्यांचे नियोजनकर्ते तसेच प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसते. औरंगाबाद शहरातील वाॅर्डाची तुलना करता येथील दोन्हीही वाॅर्ड विस्तीर्ण आहेत. त्यामुळे उमेदवारांचीही धावपळ होते. येथील उमेदवार अन् मतदारांनाही एवढ्या मोठ्या वाॅर्डांची सवय नव्हती. ग्रामपंचायत झाली असती तर किमान २५ वाॅर्ड होणार होते. त्याऐवजी महानगरपालिकेचे दोनच वाॅर्ड झाले. यावरून येथील उमेदवारांची किती दमछाक होत असेल, याचा अंदाज यावा.
दररोज सायंकाळी चौक, गल्लीबोळात उमेदवार सभा घेतात. शिवसेना, भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी आमदार मंडळीही येथे प्रचाराला हजेरी लावताहेत. सातारा देवळाईचे वाटोळे झालेले आहे, याचा साक्षात्कार या निमित्ताने सर्वच पक्षांना झाला आहे. वाटोळे झाले मग ते कोणीतरी केले असेलच. म्हणून प्रत्येक पक्ष दुसऱ्याकडे बोट दाखवतोय. शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. येथील आमदार शिवसेनेचा आहे. तेव्हा शिवसेनेमुळेच सातारा देवळाईचा विकास होऊ शकला नाही, असा भाजपचा आरोप आहे, तर राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने या परिसराच्या विकासासाठी निधी दिला नाही, त्यामुळेच येथे विकास होऊ शकला नाही, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतो. लढत या दोन पक्षांतच असल्याचे सध्याचे चित्र असल्याने या दोघांत आरोप-प्रत्यारोप कसे होतात, याची मतदारांनाही उत्सुकता आहे. हे दोन्हीही पक्ष प्रचार करताना काँग्रेसने या परिसराचे वाटोळे केले हे सांगण्यास विसरत नाहीत. कारण पूर्वी येथे राज्यात काँग्रेस सत्तेत होती. राष्ट्रवादीला गमावण्यासारखे काहीच नाही, तरीही एका वाॅर्डात प्रचार करताना राष्ट्रवादीचा उमेदवार इतरांपेक्षा आपण कसे चांगले ठरू हे सांगण्यास विसरत नाही. सेना-भाजप किंवा काँग्रेसमुळे या भागाचे वाटोळेच होईल, असा त्याचा दावा.

खरे तर या परिसरात लौकिक अर्थाने ‘विकास’ व्हायला सुरुवात झाली, तेव्हाच दुसऱ्या बाजूला वाटोळे होण्यासही प्रारंभ झाला. या परिसरात बांधकामे सुरू झाली तेव्हाच येथे एक तर नगर परिषद व्हायला हवी होती किंवा थेट आता झाला तसा महानगरपालिकेत समावेश. परंतु स्थानिक राजकारण्यांनी ग्रामपंचायतीकडून दणादण बांधकाम परवाने घेऊन टोलेजंग इमारती बांधल्या. एफएसआय नावाचा काही प्रकार असतो, मोठ्या वसाहतीला मोठे रस्ते लागतात, याचा साधा विचारही केला नाही. जुन्या शहरात आता बांधकामांना वाव नाही. त्यामुळे नवीन चाकरमानी साताऱ्याकडेच जाणार याची सर्वांनाच कल्पना होती. तरीही कोणी लक्ष दिले नाही. या प्रकारामुळे परिसराचे वाटोळे होतेय, याची अनेकांना कल्पना होती. परंतु प्रत्येकाचे डोळे तेव्हा बंद होते. साताऱ्याच्या मूळ रहिवाशांनी जमिनी विकून किंवा इमारती बांधून बक्कळ पैसे कमावले. कायदाच नको म्हणून ग्रामपंचायतच कायम कशी राहील, याची खबरदारी घेतली. तेव्हाही त्यांना आपले हे गाव वाटोळ्याच्या दिशेने जाते, याचे भान राहिले नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कधी वाटोळ्याचा विषय निघाला नाही. आता जेव्हा महानगरपालिकेचे मतदार झाले तेव्हा सर्वांनाच आपल्या परिसराचे वाटोळे झाल्याचा साक्षात्कार झाला. त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये आहे, तर त्यावर तासन््तास चर्चा करण्यात मतदार व्यग्र आहेत. आता वाटोळे झाले पुढे काय, यावर चर्चा करताना कोणी दिसत नाही. काहीतरी चमत्कार होईल अन् शहर एकदम चांगले होईल, असेच बहुधा अनेकांना वाटत असावे; पण आपल्या शहराचे वाटोळे होऊ नये, यासाठी आपण काय केले पाहिजे, याचा कोणी विचार करत नाही. यातून मार्ग निघू शकतो काय, भविष्याचे नियोजन कसे असेल, या परिसराला विकास आराखडा असावा की नाही, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी काय केले जाईल, यावर मतदार तर सोडाच तज्ज्ञही बोलत नाहीत. काहीही असो निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, आपल्या परिसराचे वाटोळे झाले, हे मतदारांपर्यंत पोहोचले, हेही नसे थोडके.