आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसुब्यांना खीळ तरीही ‘बिहाइंड स्क्रीन’खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई या दोन गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन होईल अन् आपला सवतासुभा निर्माण करता येईल, अशी अपेक्षा या परिसरात राजकारण करणाऱ्या पटेल परिवारांची होती. त्या दिशेने त्यांनी तयारीही सुरू केली होती. काही महिन्यांसाठी नगर परिषद झाली तेव्हाच ही मंडळी कामाला लागली होती. मात्र, या गावांचा मनपात समावेश होताच या मंडळींचा हिरमोड झाला. त्यातच सातारा वाॅर्ड आरक्षित झाला अन् कायम राजकीय पटलावर असणारी ही मंडळी गायब झाली. या दोन्ही वॉर्डांतील प्रचार अंतिम टप्प्यात असताना अनेक वर्षे ग्रामपंचायतीचे राजकारण करणारे येथील पटेल गेले कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र, ही मंडळी राजकारणापासून ना अलिप्त झाली ना दूर गेली. त्यांनी परिस्थितीशी काहीशी तडजोड केली. यातील काही जण पडद्यामागून काँग्रेसचा प्रचार करताहेत. ‘बिहाइंड स्क्रीन’राहून येथील राजकारणावर आपली पकड कायम राहावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही परिस्थितीत मूळ सातारा गावचा वॉर्ड आपल्या म्हणजेच काँग्रेसच्या हातून जाऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आरक्षित झालेल्या या वॉर्डात खरी लढत ही शिवसेना भाजप यांच्यात नव्हे, तर या दोन पक्षांचे उमेदवार विरुद्ध राजकारणी पटेल यांच्यात आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण याच्याशी त्यांना देणेघेणे नाही. सातारा गावावर आमचीच पकड कायम आहे, एवढेच त्यांना दाखवून द्यायचे आहे.
सातारा देवळाई या दोन्हीही ग्रामपंचायती अनेक वर्षे काँग्रेसच्याच ताब्यात राहिल्या. सातारा हे जिल्हा परिषदेचे सर्कलही होते. येथूनही काँग्रेसने वेळोवेळी विजय मिळवला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद याच सर्कलला मिळाले होते. थोडक्यात, येथील मतदारांवर पटेलांची मजबूत पकड आहे. नगर परिषद झाली असती तर ती पटेलांच्या ताब्यात गेली असती. याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना आल्यानेच राजकीय खेळी खेळत येथील नगर परिषद रद्द करण्यात आली. भाजपला येथे नसलेला जनाधार हेही एक प्रमुख कारण होते. भाजप सरकारच्या या निर्णयाचा फटका खऱ्या अर्थाने पटेलांनाच बसला. ऐतिहासिक औरंगाबाद शहरालगतचे एक सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याच्या त्यांच्या मनसुब्यांना खीळ बसली. आता हा परिसर मनपात समाविष्ट झाल्याने जिल्हा परिषदेचे सर्कलही रद्द होईल. म्हणजे जिल्हा परिषदेसारख्या मिनी मंत्रालयातही त्यांना आता राजकारण करता येणार नाही अशी तजवीज शासनाच्या निर्णयाने आपोआपच झाली. मात्र, हार मानतील ते मूळ साताऱ्याचे रहिवासी कसले? त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहत मूळ पक्ष काँग्रेसचे काम सुरू ठेवले. नव्हे, मोठ्या जोमाने पुढे नेणे सुरू केले आहे. या दोन वॉर्डांपैकी एका ठिकाणी जरी काँग्रेस विजयी झाली तर त्याचा राजकीय फायदा आपोआपच पटेलांना होईल अन् कदाचित दोन्हीही वॉर्डांत काँग्रेसला ते विजयी करू शकले तर तो युतीसाठी मोठा फटका असेल.
सातारा देवळाई हे वॉर्ड खूपच मोठे झाले आहेत, परंतु वॉर्डांची संख्या वाढवणे शक्य नसल्याने २०२० च्या मनपा निवडणुकीत वॉर्डांच्या सीमा पुन्हा निश्चित कराव्या लागतील. परिणामी राजकीय समीकरणेही बदलतीलच. परंतु तोपर्यंत पटेल या परिसरात आणखी तगडे झालेले असतील. कोणाला पटेल पटेल, पण सातारा-देवळाई या जुन्या गावांचा परिसर काँग्रेसी पटेल आपल्या हातून जाऊ देणार नाहीत. यासाठी ते पेटलेले आहेत. त्यामुळेच येथे एमआयएमने लढू नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. अर्थात, ती किती जणांना पटेल हे सांगता येत नाही. एकूणच सोमवारी जेव्हा येथील दोन वॉर्डांचा निकाल लागेल तेव्हा बऱ्याच गोष्टी अनेकांना पटतील किंवा पटणारही नाही.
बातम्या आणखी आहेत...