आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौड कुटुंबीयांच्या मृत्यूने विजयनगर कॉलनीवर शोककळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्रपाठक डॉ. के.वाय. दौड (67) तसेच त्यांची पत्नी सरस्वतीबाई ( 60) तसेच मुलगा सूरज ( 19) या तिघांवर त्यांच्या मूळ गावी पानवडोद (ता. सिल्लोड) येथे रविवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दौड कुटुंबीय रविवारी नेवासा फाट्याकडून येत असताना त्यांचा भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. दौड कुटुंब मूळ सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील रहिवासी होते. या अपघातात दौड कुटुंबातील 3 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दौड कुटुंबासोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पश्चात पानवडोद सोसायटीचे चेअरमन शामराव दौड, रामराव दौड, शेषराव दौड यांच्यासह भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.

एक चांगले राजकीय अभ्यासक, विचारवंत प्राध्यापक आपल्यातून निघून गेले याचे वाईट वाटते. त्यांनी अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले आहेत, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी शोक व्यक्त केला. जुन्या प्राध्यापक मंडळींपैकी डॉ. के. वाय दौड एक होते. त्यांचे अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्व होते. चांगला मित्र हरवला याचे दु:ख होत असल्याचे प्रा. सुरेश पुरी म्हणाले. तर के. वाय. दौड यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. मॅनेजमेंट कौन्सिलचे ते सदस्य होते. तसेच राज्यशास्त्र विभागाच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. एक निर्मळ आणि प्रामाणिक शिक्षक विद्यापीठाने गमावला असे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे म्हणाले.