आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Day Care Center Start In Bamu University Aurangabad

विद्यापीठात हलणार 27 जूनला पाळणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लहान मुलांमुळे शिक्षण अर्धवट सोडून संसारात रमणार्‍या महिलांना आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी आगामी शैक्षणिक सत्रापासून मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बहुप्रतीक्षेत (डे केअर सेंटर) पाळणा घराला अखेर 27 जूनचा मुहूर्त सापडला आहे. स्त्री शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला अमलात आणण्यासाठी विद्यापीठाकडून सहा महिन्यांची दिरंगाई झाली आहे. आता आठशे ते चारशे रुपयांच्या (दरमहा) बदल्यात शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांना आपले पाल्य येथे सोडता येईल.

मुलींचे एम. ए., एम. कॉम, एम. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे लगेच विवाह लावून देण्याच्या पद्धतीमुळे मुलींची शैक्षणिक प्रगती खुंटल्याचे स्पष्ट झाले. विवाहानंतर लगेच मुलांची जबाबदारी पडते. त्यामुळे एम.फिल, पीएचडीचे शिक्षण घेणार्‍या मुलींचे प्रमाण नगण्य असल्याचे यूजीसीच्या लक्षात आले आहे.

त्यामुळे यूजीसीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठाने ‘पाळणा घर’ सुरू करण्यासाठी 28 डिसेंबर 2012 च्या व्यवस्थापन परिषद बैठकीत ठराव मंजूर केला. 29 जानेवारी 2013 रोजी त्यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक जारी करून पुढील आठ दिवसांतच पाळणा घर सुरू करण्याचे सुनिश्चित केले होते. मात्र ‘डे केअर सेंटर’ सुरू करणे विद्यापीठाला मागील सहा महिने शक्य झाले नाही. समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आणि प्रसिद्ध स्त्रीवादी अभ्यासक डॉ. स्मिता अवचार यांना ‘डे केअर सेंटर’चे समन्वयक करण्यात आले आहे. त्यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून पाळणा घराचे रखडलेले काम मार्गी लावले आहे. 27 जून 2013 पासून विद्यापीठाच्या सत्राला सुरुवात होणार असून औपचारिकरीत्या सेंटरही सुरू होईल. त्यानंतर कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतले जाणार असल्याचे डॉ. अवचार यांनी म्हटले आहे. मुलींच्या वसतिगृहाशेजारील प्राध्यापक सदनिका पाळणा घरासाठी दिली आहे. बाळांच्या काळजीसाठी पूर्णवेळ पण विनाअनुदानित तत्त्वावर एक अधीक्षक, दोन आया आणि एक सफाई कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

यांच्या पाल्यांना मिळेल लाभ
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जालना, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

महाविद्यालयीन कार्य करणार्‍यांना विद्या प्रबोधिनीत उजळणी अथवा उद्बोधन वर्गासाठी यावे लागते किंवा संशोधन कार्यासाठी औरंगाबादेत यावे लागले तर आपल्या मुलांना ‘डे केअर सेंटर’मध्ये ठेवता येईल. सकाळी 9:00 ते 6:00 पर्यंत पाळणा घर सुरू राहील.

उत्पन्नानुसार आकारणार शुल्क
सर्वांना वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्ग-1 आणि वर्ग-2 चे अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांकडून दरमहा आठशे रुपये घेण्यात येईल. शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग-3 व 4) संशोधक तथा उच्च्शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरमहा 400 रुपये द्यावे लागतील.

कुलगुरूंची वेळ मिळताच उद्घाटन
27 जूनपासून विद्यापीठाच्या सत्राला सुरुवात होणार असून त्याचवेळी पाळणा घर सुरू करू. कुलगुरूंची वेळ मिळाल्यानंतर पुढे मागे उद्घाटन करून घेतले जाणार आहे. फर्निचर, खेळणी आणि गरजेच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रा. डॉ. स्मिता अवचार, समन्वयक, पाळणा घर.