Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» DB Star News

औरंगाबादच्या कॅनॉटमध्ये सर्व व्यापारी स्वखर्चातून बसवणार एचडी सीसीटीव्ही कॅमेरे

नामदेव खेडकर | Mar 20, 2017, 11:41 AM IST

  • औरंगाबादच्या कॅनॉटमध्ये सर्व व्यापारी स्वखर्चातून बसवणार एचडी सीसीटीव्ही कॅमेरे
औरंगाबाद-कॅनॉट प्लेसमधील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने चारही चौकांमध्ये चोहोबाजूला नजर राहील असे १६ सीसीटीव्ही कॅमेरे (एचडी) स्वखर्चातून बसवण्याचा निर्णय येथील व्यापारी आणि रहिवाशांनी घेतला आहे. पूर्वी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॅमेरे बसवले होते. मात्र, ते बंद पडल्याने आता नव्याने चांगल्या प्रतीचे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. स्वयंसुरक्षा म्हणून डीबी स्टारनेही असे कॅमेरे बसवले जावेत म्हणून आवाहन केले होते. दुसरीकडे या भागात आता पोलिसांची गस्त वाढली आहे.

कॅनॉट प्लेसमध्ये व्यावसायिक दुकाने, वेगवेगळ्या आस्थापनांची कार्यालये आणि निवासी इमारती आहेत. येथे नोकरी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. मागील काही दिवसांमध्ये या भागामध्ये रस्त्यात वाढदिवस साजरे करणे, शुभेच्छांचे फलक बेकायदेशीरपणे लावणे, भांडणे, दादागिरी अशा घटना वाढल्या होत्या. औरंगाबाद शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारपेठ म्हणून पुढे येत असतानाच येथील व्यापारी आणि रहिवाशांना या गोष्टींचाही सामना करावा लागत होता.

डीव्हीआरपर्यंत जाईल फुटेज
अशा गोष्टींना पायबंद बसावा म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या चारही चौकांंमध्ये व्यापाऱ्यांनी पूर्वी कॅमेरे बसवले होते. त्यांचा डीव्हीआर सेटअप पोलिस उपायुक्त झोन कार्यालय, सेंट्रल नाका येथे होता. झोन ऑफिस ते कॅनॉटपर्यंत केबललाइन टाकलेली होती. मात्र, ती वारंवार बर्स्ट होत असल्याने कॅमेऱ्याचे फुटेज डीव्हीआरपर्यंत पोहोचतच नव्हते. आता व्यापाऱ्यांनी उच्च प्रतीचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तेे वायरलेस असतील. वायफायने डीव्हीआरपर्यंत फुटेज पोहोचेल.

कुणीही अतिक्रमण करणार नाही
या भागामध्ये कुणीही व्यापारी, व्यावसायिक अतिक्रमण करणार नाही. आम्ही ते करूही देणार नाही. कॅमेऱ्यांबरोबरच पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला मार्किंग करू. ग्राहक, व्यावसायिक व रहिवाशांना त्रास होणार नाही, यासाठी आम्ही उपाययोजना करू.
- प्रदीप राठोड, अध्यक्ष, कॅनॉट व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

स्वखर्चातून मार्किंग करणार
पोलिसांची सध्या जी मदत आम्हाला मिळत आहे, त्यामध्ये सातत्य राहिले पाहिजे. तरच सध्या या भागात जशी शांतता आहे, तशीच पुढेही नेहमीसाठी राहील. पार्किंगसाठी लवकरच रस्त्याच्या कडेला आम्ही स्वखर्चातून मार्किंग करणार आहोत.
- योगेश झवेरी, व्यावसायिक

आता सुरक्षित वातावरण
सध्या कॅनॉटमधील वातावरण सुरक्षित बनले आहे. कुटुंबीयांसह नागरिक येथे खरेदीसाठी येत आहेत. असेच वातावरण कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आम्ही हे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
- ज्ञानेश्वर खर्डे, उपाध्यक्ष, कॅनॉट व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

पोलिसांचीही साथ मिळतेय
सीसीटीव्ही बसवल्यानंतर कॅनॉट परिसर पूर्णपणे सुरक्षित बनेल. पोलिसांचीही आम्हाला चांगली साथ मिळत आहे. दररोज या भागात पोलिसांची गस्त सुरू असते. याचा परिणाम नक्कीच चांगला होईल व वातावरण सुरक्षित राहील.
-संतोष मुथा, सदस्य, कॅनॉट व्यापारी वेल्फेअर असोसिएशन
शौचालयाची व्यवस्था करू
कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. ती आम्ही दूर करणार आहोत. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित वाटावे, असे काम आम्ही येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन करणार आहोत.
- अनिल सॉलोमन, सचिव, कॅनॉट व्यापारी वेलफेअर असोसिएशन

पोलिस चौकीची मागणी
सुरक्षित आणि स्मार्ट कॅनॉट बनवण्याचा निर्धार सर्व व्यापाऱ्यांनी केला आहे. या भागामध्ये पोलिस चौकीची मागणी आम्ही केली होती. पोलिस आयुक्तांनी तयारी दर्शवली असून लवकरच ती सुरू होईल.
- दत्तात्रय वाणी, व्यावसायिक तथा वॉर्ड अध्यक्ष, भाजप

कॅमेऱ्यांमुळे आता हा परिसर अधिक सुरक्षित होईल
कॅनॉटमध्ये व्यापाऱ्यांंनी सीसीटीव्ही बसवण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. मध्यंतरी मीही त्या ठिकाणी पाहणी केली तेव्हा त्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता कॅमेऱ्यांमुळे हा परिसर अधिक सुरक्षित होईल. दुसरी बाब म्हणजे सध्यातरी कॅनॉटमध्ये पार्किंगची समस्या नाही आणि जर त्याबाबत काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी आमचे नक्कीच सहकार्य राहील.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

आता अतिक्रमणाची बारी
कॅनॉटमध्ये दादागिरी, भांडणे व इतर कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलिस रोज गस्त घालत आहेत. व्यापाऱ्यांनीही चारही चौकात चांगल्या दर्जाचे आधुनिक सीसीटीव्ही बसवून वातावरण अधिक सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता पार्किंगचा महत्त्वाचा प्रश्न तेवढा सुटणे बाकी आहे. या ठिकाणी ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते काढून घेतले तर त्या ठिकाणी पार्किंगची सोय होऊ शकते. अर्थात हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मनपाची आहे. डीबी स्टारला दिलेल्या मुलाखतीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याबाबत पुढाकार घेण्याचे सूतोवाच केले होते. या ठिकाणी अतिक्रमण होऊच देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. त्यामुळे आता त्याबाबत मनपाबरोबर संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर कॅनॉटमधील रहिवासी, व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटू शकेल.

नेमकी कधी होणार चौकशी पूर्ण?
निरपराध विद्यार्थ्यांना रात्रभर लॉकअपमध्ये ठेवून मारहाण केल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुले निर्दोष असतील तर केस परत घेऊ असे ते म्हणाले होते, पण अजून त्याबाबत हालचाली झालेल्या नाहीत. अशा सोप्या प्रकरणातही किती दिवस चौकशी चालणार हा प्रश्न उपस्थित होतो.

निरपराध्यांवर कारवाई करून काय साधले? संतप्त नागरिकांचा सवाल, प्रतिक्रिया सुरूच
जे गुंडगिरी करतात ते मोकळेच फिरतात आणि ज्यांचा काहीही दोष नाही अशा निरपराध मुलांवर कारवाई करून पोलिसांनी काय साधले? अशाने पोलिसांची प्रतिमाच डागाळली आहे. त्यामुळे निदान यापुढे तरी असे प्रकार होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी, अशा शब्दांत पुन्हा अनेकांनी संताप व्यक्त केला.

पोलिस हे जनतेचे रक्षक आहेत की भक्षक हे कळायला मार्ग नाही. निर्दोष मुलांना जो मानसिक ताण झाला त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.
- अजय नागरगोजे

निरपराध मुलांवर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे. त्या दोषी पोलिस अधिकाऱ्यावर करवाई करून सर्व मुलांना न्याय मिळाला पाहिजे.
- वंदना गित्ते

निरापराध मुलांना त्रास दिला. त्यांना अपराध्यासारख ठेवून त्यांची मानहानी करण्यात आली. आता त्यांना न्याय देऊन त्याची भरपाई करावी. हे करताना संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर आवर्जून कारवाई करून जनमानसात चांगला संदेश पोलिसांनी द्यावा.
- सुरेखा सानप

त्या निरपराध विद्यार्थ्यांवर खरोखरच पोलिसांनी अन्याय केला आहे. ही मुले चांगल्या घरातील व शिकलेली आहेत. जे खरोखरच गुंडगिरी करतात ते मोकळेच आहेत आणि ज्यांचा काहीही दोष नाही अशांना मात्र त्रास दिला जातोय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी
- डॉ. रूपाली दराडे

Next Article

Recommended