आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंपदा टंचाई: मनपाने दरवर्षी ठेवली मोठी थकबाकी, आता मात्र दाखवत आहे समांतरकडे बोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षी पाणीपट्टी भरावी लागते. मात्र, मनपाने ३१ डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत असलेली साडेसहा कोटींची थकबाकी अद्यापही भरलेली नाही. समांतरकडे योजना हस्तांतरित केल्यानंतर दोन वर्षांच्या काळात समांतरने थकबाकी भरली नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे मनपाचे म्हणणे आहे. मात्र, समांतरने दोन वर्षांत जवळपास ८० कोटी रुपयांची वसुली थेट मनपाच्याच खात्यात जमा केल्याचा दावा केला आहे. 

मनपाकडे ३१ डिसेंबर २०१६ अखेर ६ कोटी २३ लाख २४ हजार रुपये पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. त्यापूर्वी विभागाने त्यांना नोटीसही बजावली आहे. मात्र, मनपाने थकीत रक्कम जमा केली नाही. अखेर जायकवाडी विभागाने पुन्हा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणातील मनपाच्या पंपहाऊसला ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. रक्कम भरली नाही तर, ८ मार्चपासून मनपाचा  पाणीपुरवठा बंद करू, असे त्यात स्पष्ट म्हटले आहे. पाणीपुरवठा बंद केल्यास उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मनपा, जिल्ह्यातील नगर परिषदा, साखर कारखाने व ग्रामपंचायतींकडे असलेल्या थकबाकीबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. 

दरवर्षी राहते थकबाकी
जलसंपदा विभाग जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी मनपाला वार्षिक पाणीपट्टीची आकारणी करते. वर्षाला सरासरी ३ कोटी रुपये एवढी रक्कम भरावी लागते. मात्र, पालिकेने कोणत्याच वर्षी पूर्ण रक्कम जमा केली नाही. परिणामी जुनी थकबाकी पुढील प्रत्येक वर्षाच्या चालू बिलात लागून येते. जलसंपदा विभागाला विचारणा केली असता मनपाने कोणत्याच वर्षी १०० टक्के पाणीपट्टीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे समांतरमुळेच थकबाकी आहे, असे म्हणून पालिका आपली सुटका करून घेऊ शकत नाही. बड्या थकबाकीदारांवर धडक कारवाई करून वारंवार नाचक्की होणार नाही याची व्यवस्था करण्याची गरज आहे. महावितरणने पथदिवे बंद केले होते. आता तर भर उन्हाळ्यात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.

समांतरचा दावा: ५ महिन्यांतच आम्ही केली ५ कोटींची वसुली
आम्ही गेल्या दोन वर्षांत ८० कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल केली असल्याचा दावा समांतरचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अविक विश्वास यांनी केला आहे. त्यानुसार समांतरने थकबाकीदार ग्राहकांसाठी सन्मान योजना सुरू केली होती. यामुळे सुलभ हप्त्यांमध्ये ग्राहकांना थकबाकी भरणा शक्य झाले. १६ हजार ग्राहक असे होते ज्यांनी ३ ते ५ वर्षे पाणीपट्टीच भरली नव्हती. ही रक्कम १८ कोटींपेक्षा जास्त होती. 

५ वर्षे अधिक थकबाकी असणारे ३३ हजार ग्राहक होते. त्यांच्याकडे ८७ कोटी थकबाकी होती आणि ३ वर्षांखालील थकबाकी असणारे ७ हजार असे ग्राहक होते ज्यांच्याकडे ४ कोटी रुपयांची थकबाकी होती. समांतरने अशा ७००० पेक्षा अधिक ग्राहकांना सन्मान योजनेत सहभागी करून घेतले आणि केवळ ५ महिन्यांपेक्षा कमी काळात ५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. समांतरने सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत तब्बल ७६.२ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे.

मनपाचे मात्र समांतरकडे बोट
औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा १ सप्टेंबर २०१४ रोजी समांतर म्हणजेच औरंगाबाद वॉटर युटिलिटी सर्व्हिसेस या कंपनीकडे सोपण्यात आला होता. दोन वर्षे समांतरने पाणीपुरवठा योजना चालवली. मात्र, समांतरने या दोन वर्षांमध्ये थकबाकी आमच्याकडे जमा केली नसल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे मनपाचे म्हणणे आहे. समांतरने याप्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे.

ही समांतरचीच थकबाकी
मध्यंतरी शहराची पाणीपुरवठा योजना समांतरकडे होती. मात्र, त्यांनी दोन वर्षांमध्ये पाणीपट्टीची थकबाकी आमच्याकडे भरलेली नाही. १ ऑक्टोबर २०१६ पासून शहराचा पाणीपुरवठा मनपाकडे हस्तांतरित झाला. तेव्हापासून एक कोटींची थकबाकी आहे. सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्यास तयार आहोत. याबाबत संबंधित विभागाला लेखी विनंतीही करणार आहोत.
- सरताजसिंह चहल, कार्यकारी अभियंता, मनपा

जलसंपदाने कारखानदारांचे नाक दाबावे 
जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा बंद करू नये. तसे केल्यास त्याची झळ थेट सर्वसामान्यांना बसेल. मनपाने तातडीने थकबाकी जमा करणे अपेक्षित आहे, तर जलसंपदा विभागानेसुद्धा त्यांना टप्प्याटप्प्याने थकीत रक्कम भरण्याची मुभा द्यावी. औरंगाबाद जिल्ह्यातील थकबाकीदार नगर परिषदा, साखर कारखाने आणि ग्रामपंचायती आणि बडे उद्योजक यांच्याकडे असलेली कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्याची  कार्यवाही अतिशय प्रभावीपणे राबवणे अत्यंत गरजेचे आहे. तरच ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...