आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी स्टार पर्दाफाश: दीड कोटींवर मारला डल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जि. प. शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधकामासाठी 2011-12 या आर्थिक वर्षात एक कोटी 50 लाख 50 हजार रुपये निधी देण्यात आला. त्यानंतर पंचायत विभागाने जिल्ह्यातील एकूण 430 शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांच्या मागणीनुसार निधीचे नियोजन केले. प्रत्येकी 35 हजार याप्रमाणे एकूण 430 शाळांना निधी वाटप करण्यात आला. 5 मार्च 2012 रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या निधीस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर डीबी स्टारने पाहणी केली असता बहुतेक शाळांमध्ये स्वच्छतागृहेच बांधल नसल्याचे उघड झाले आहे. यातील काही शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची गरज असतानाही तेथे ती बांधण्यात आली नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
जिल्ह्यात येथे नाहीत स्वच्छतागृहे
डीबी स्टारने तीन दिवस जिल्ह्यातील विविध शाळांचा दौरा करून पाहणी केली. त्यामध्ये सहा तालुक्यांतील बहुतांश शाळांनी स्वच्छतागृहे बांधलीच नसल्याचे आढळून आले आहे.
* औरंगाबाद तालुका : अब्दीमंडी, करोडी, चित्तेगाव, गवळीमाथा सेलूद, पवारमाळा लाडसावंगी, उबाळेमाळा लाडसावंगी, लामकानावाडी.
* गंगापूर तालुका : परतापूरवाडी, नारायणपूर खुर्द, पिंपरखेडा, रांजणगाव, पाखोरा.
* खुलताबाद तालुका : कसाबखेडा (मराठी) आणि कसाबखेडा (उर्दू), भांडेगाव
* पैठण तालुका : बंगला तांडा (बिडकीन), कौडगाव, बन्नी तांडा, ढोरकीन प्राथमिक शाळा, ढोरकीन प्रशाला, ढोरकीन तांडा, दादेगाव खुर्द, दादेगाव बुद्रुक, फारोळा, गिधाडा, निलजगाव तांडा नं. 2, वरवंड खुर्द, पाचलगाव.
* सिल्लोड तालुका : अजिंठा सराय, अजिंठा हायस्कूल.
* सोयगाव तालुका : धाप अंतूर, मूर्ती येथील जि. प. शाळा.
एकही काम अंदाजपत्रकानुसार नाही
जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता विभागाने तयार केलेल्या मुलींच्या स्वच्छतागृहाच्या अंदाजपत्रकात एक टॉयलेट आणि पाच मुतारींचा समावेश आहे. मुलींच्या मुतारीमध्ये युरिनल पॅन बसवून त्यामध्ये टाइल्स बसवाव्यात आणि उतार व्यवस्थित करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यात म्हटले आहे. मात्र, सर्वच शाळांनी बांधकाम करताना एक टॉयलेट तर बांधले; पण कुठे दोन, कुठे तीन, तर कुठे चार मुता-याच बांधल्या आहेत. त्यातही खुलताबाद तालुक्यातील आखतवाडा येथील शाळा वगळता एकाही शाळेने युरिनल पॅन बसवले नाहीत. आखतवाडा येथील शाळेनेही पाचऐवजी दोनच पॅन बसवले आहेत.
तालुकानिहाय मिळालेला निधी
जिल्ह्यात सर्वाधिक निधी पैठण आणि गंगापूर या तालुक्यांना मिळाला आहे. गंगापूरला 73 शाळांसाठी 25 लाख 55 हजार, तर पैठण तालुक्याला 74 शाळांसाठी 25 लाख 90 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. त्या खालोखाल वैजापूर- 64 शाळांसाठी 22 लाख 40 हजार, औरंगाबाद आणि सिल्लोड- प्रत्येकी 52 शाळांसाठी 18 लाख 20 हजारप्रमाणे 36 लाख 40 हजार, कन्नड- 49 शाळांसाठी 17 लाख 15 हजार, फुलंब्री- 26 शाळांसाठी 9 लाख 10 हजार, सोयगाव- 21 शाळांसाठी 7 लाख 35 हजार आणि खुलताबाद-19 शाळांसाठी 6 लाख 65 हजार रुपये निधी देण्यात आला आहे.
निधी खर्च झाला
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटविकास अधिका-यांना धनादेशाद्वारे निधीचे वितरण केले. त्यानंतर त्यांनी निवड झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रत्येकी 35 हजार याप्रमाणे निधी वाटप केला. मात्र, बहुतांश शाळांना हा निधीच मिळालेला नाही; पण निधी मात्र खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. असे असेल तर मग हा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका गेला कुठे? गटविकास अधिका-यांनी हडपला? गटशिक्षणाधिका-यांनी हडपला की मुख्याध्यापकांनी? चौकशीअंती सर्वकाही बाहेर येईलच.
फौजदारी कारवाई करू
प्राथमिक शिक्षण विभागाने याप्रकरणी संपूर्ण चौकशी करणे अपेक्षित आहे.शिक्षणाधिका-यांनी संबंधितांवर जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.
-दीपक चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी
पूर्णत्व प्रमाणपत्रे मागवणार
सर्व गटशिक्षणाधिका-यांची बैठक बोलावली असून त्यात हा मुद्दा मांडला जाईल. तसेच मुख्याध्यापकांकडून पूर्णत्व प्रमाणपत्रे मागवण्यात आल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी
शाळांची पाहणी करणार
ज्या शाळांना निधी देण्यात आलेला आहे आणि ज्या शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधलेली नाहीत, अशा शाळांची आम्ही आधी पाहणी करू. त्यानंतर संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-एन. के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी
काय म्हणतात मुख्याध्यापक
आम्हाला 35 हजार रुपये मिळाले नाहीत. ग्रामपंचायतीच्या जुन्या स्वच्छतागृहाचाच आम्ही वापर करत आहोत. तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतूनही बांधकाम झालेले आहे.
-एम. एम. जाधव, मुख्याध्यापिका, अब्दीमंडी, ता. औरंगाबाद.
आमच्या शाळेला 35 हजार रुपये मिळणार होते; परंतु अद्याप हा निधी मिळालेला नाही. आमच्याकडे जुनेच स्वच्छतागृह आहे. त्याचाच सध्या वापर होत आहे.
-शिवाजी महालकर, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, ढोरकीन, ता. पैठण.
आम्हाला 35 हजार रुपये मिळालेले नाहीत. आमच्या शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याने आम्ही ग्रामपंचायतीची स्वच्छतागृहे वापरतो.
-अरुण साळुंके, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, फारोळा, ता. पैठण.
आम्हाला 35 हजार मिळाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या निधीतून आधीच स्वच्छतागृह बांधले असून 35 हजार मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीला पैसे परत केले आहेत.
-काशीनाथ करडे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, वेरूळ तांडा, ता. खुलताबाद.