Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Db Star special News

दिल्लीच्या पीयूषचा अनोखा छंद; उलट्या अक्षरांनी लिहिले धार्मिक ग्रंथ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 13, 2017, 02:33 PM IST

एखाद्या गोष्टींचा छंद जडला की, तो आयुष्याचा भाग होऊन जातो. असेच छंद दिल्लीतील पीयूष गोयल याला आहेत.

 • Db Star special News
  एखाद्या गोष्टींचा छंद जडला की, तो आयुष्याचा भाग होऊन जातो. असेच छंद दिल्लीतील पीयूष गोयल याला आहेत. इंजिनिअरिंग करत असताना त्याने उलट्या अक्षरांत भगवद््गीता लिहिली. तसेच हरिवंशराय बच्चन यांचे प्रसिद्ध ‘मधुशाला’ हे काव्य त्याने सुईने लिहिले आहे...
  पीयूष १५ वर्षांचा असताना एकदा एका बँक मॅनेजरने त्यांच्याकडील स्टॅम्पचे कलेक्शन भेट दिले. ते त्याला खूप आवडले. आकर्षक आणि विविध प्रकारचे स्टॅम्प पाहून आपणही यासारखा संग्रह करू शकतो, असा विश्वास त्याला आला. तेव्हापासून त्याने विविध वस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत असतानाही त्याने आपल्या छंदासाठी वेळ काढला.
  स्टॅम्पच्या कलेक्शनपासून सुरू झालेली पीयूषची संग्रहाची आवड सध्या वेगवेगळ्या मार्गांनी सुरू आहे. आजपर्यंत त्याच्याकडे अडीच ते तीन हजार स्टॅम्प, विविध प्रकारचे आणि कंपन्यांचे हजारो पेन, शेकडो काडीपेटी बॉक्स, मिसप्रिंट पोस्ट कार्ड आहे. याच काळात पीयूषला उलट्या अक्षरांचे वाक्य लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्याने घरातील भगवद््गीता उलट्या अक्षरांत लिहिली. त्याबरोबरच जुन्या धार्मिक पुस्तकांचा संग्रहही त्याने केला आहे. संस्कृत भाषेतील श्री दुर्गा सप्तशती, अवधी भाषेतील सुंदरकांड, हिदी- इंग्रजी भाषेतील श्री साई चरित्र अशी पुस्तकेही त्याच्याकडे आहेत.
  उलटे लिखाण...
  कॉलेजमध्ये असताना आरशासमोर कागद धरून उलटे लिहिलेले शब्द असलेले एक लेटर पीयूषच्या मित्राने त्याला दिले. उलटे लिहिण्याचा हा प्रकार पीयूषला आवडल्याने त्यानेही असेच शब्द लिहिण्याचा सराव केला. ही आवड वाढल्यानंतर १८ अध्याय आणि ७०० श्लोकांच्या भगवद््गीता त्याने उलट्या अक्षरांत लिहिली.
  पुढील स्लाइवडर वाचा, तीन हजार पेन, सात हजार मॅचबॉक्स... सुईने लिहिली मधुशाला... पुस्तक लिखाणाचा मानस

 • Db Star special News
  तीन हजार पेन
  मागील वीस वर्षांपासून संग्रहाला सुरुवात करणाऱ्या पीयूषकडे आजे विविध कंपन्यांच्या तीन हजार पेनांचा संग्रह आहे. सेंटवाले, लाइटवाले, रबर स्टॅम्प असलेले, ऑटोमॅटिक शाई ओढणारे, रोलर पेन, बॉल पेन, स्पंज लावण्यात आलेला पेन असे अनेक प्रकारचे पेन त्याच्याकडे आहेत. पार्कर कंपनीचा १, ८०० रुपयांचा पेनही त्याच्याकडे आहे.
 • Db Star special News
  सात हजार मॅचबॉक्स...
  पीयूषकडे सात हजारांहून अधिक मॅच बॉक्सचा संग्रह आहे. विविध पक्षी, प्राणी, ढोलक, अभिनेते, वाहने, जहाज अशांची चित्र असलेली त्याच्याकडील मॅचबॉक्स लक्षवेधी आहेत. भारतासह विदेशातीलही काडीपेट्या त्याने संग्रही ठेवल्या आहेत. क्युबातील एक अनोखे मॅचबॉक्स त्याच्या संग्रहाची शान वाढवते.
 • Db Star special News
  सुईने लिहिली मधुशाला...
  हरिवंशराय बच्चन यांचे मधुशाला हे पुस्तक पीयूषने केवळ तीन महिन्यात सुईच्या साहाय्याने लिहिले.  या पुस्तकाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यासोबतच रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली हे पुस्तक पीयूषने कोनात मेहंदी भरून लिहिले आहे. या पुस्तकाचे १०३ अध्याय लिहिण्यासाठी त्याला १७ कोन व दोन वह्या लागल्या.
 • Db Star special News
  पुस्तक लिखाणाचा मानस
  राष्ट्रकवी रामधारी दिनकर यांचे पुस्तक लिखाण करण्याचा मानस आहे. आपली आवड आपल्याला आनंद देऊन जाते हे नक्की. भावी पिढीला या संग्रहातून नक्कीच फायदा होईल.
  -पीयूष गोयल, संग्राहक

Trending