आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • DB Star Sting Operation In Aurangabad Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DB स्टार स्टिंग: मला कर भरायचाय; मनपाच्या भोंगळ कारभाराचा नमुना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे लोकांनी करभरणा वेळेवर व नियमितपणे करावा म्हणून महापालिका विविध उपाययोजना करते, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे कर भरायला येणार्‍यांना मुजोर अधिकारी व कर्मचारी टोलवाटोलवी करून परत पाठवतात. स्वत:ची नळपट्टी भरायला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची वर्षभरापासून या वॉर्डातून त्या वॉर्डात आणि या विभागाकडून त्या विभागात फरपट सुरू आहे. डीबी स्टारने स्टिंग केले तेव्हा ही बाब उघड झाली. हे एक उदाहरण समोर आले असले तरी अशी असंख्य प्रकरणे मनपात घडतात. या प्रकरणाचा तपास करून कंगाल मनपाच्या भोंगळ कारभाराचे पितळ आज उघड करत आहोत.

महापालिका भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. सामान्य नागरिकांना पदोपदी याचा प्रत्यय येतो. नागेश्वरवाडीतील रहिवासी मुकुंद गोविंदराम देशपांडे हे लेखाकोश भवनातील लोकल फंड विभागात ते ऑडिटर होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी नागेश्वरवाडीत माउली अपार्टमेंटमध्ये एक जुना फ्लॅट विकत घेतला. जुन्या घरमालकाची काही पाणीपट्टी व घरपट्टी थकलेली होती. ती भरण्यासाठी ते रिक्षाने महापालिकेच्या मुख्यालयात गेले. नळपट्टी साडेआठ हजार व घरपट्टी चार हजार असे साडेबारा हजार रुपये ते दिवसभर खिशात घेऊन फिरत होते. त्यांची ही थकबाकी कोणीही घेतली नाही.

मनपाच्या दप्तरी नोंदच नाही

देशपांडे यांनी जुन्या घरमालकाचे नाव बदलून घराचे नामांतरही केले, पण अजून त्यांच्या नावाची नोंद मनपाच्या दप्तरी झाली नाही. शेवटी मूळ घरमालकाच्या नावाने तरी हा कर घ्यावा, असा तगादा देशपांडे यांनी लावला. मार्च महिना आहे टार्गेट पूर्ण होईल म्हणून तो मुख्यालयातील एका लिपिकाने जुन्या मालकाच्या नावानेच घेतला. त्यानंतर आता पुढचा करभरणा करण्यासाठी देशपांडे यांना पुन्हा चकरा माराव्या लागत आहेत.

रिक्षासाठी लागले बाराशे रुपये

कर भरण्यासाठी देशपांडे हे मुख्यालयात गेले तेव्हा त्यांना तुमचे वॉर्ड कार्यालय ड हे क्रांती चौकात असून तुम्हाला तेथेच जावे लागेल, असे सांगण्यात आले. वॉर्ड ड मध्ये गेल्यावर देशपांडे यांचा कर कोणी भरून घेतला नाही. कारण मागील कराची नोंद या कार्यालयात नव्हती. आधी ती क्लिअर करा मगच तुमचा कर घेतो, असे बोलून त्यांना सातत्याने पिटाळण्यात आले. त्यांनी सहा महिने मुख्यालय ते क्रांती चौकातील वॉर्ड कार्यालयात अनेक चकरा रिक्षाने मारल्या. त्यासाठी तब्बल बाराशे रुपये भुर्दंड बसल्याचे देशपांडे सांगतात.


स्टिंग क्र.1 ( वॉर्ड ड क्रांती चौक)
प्रतिनिधी - पाणीपट्टी भरायची, पण कुणीच घेत नाही.
कर्मचारी - त्यासाठी या आधीचा कर चुकून मुख्यालयात भरला आहे. तिकडे जाऊन पावती दाखवा व पत्र घेऊन या. मग करेक्शन होईल.

प्रतिनिधी - हे ज्येष्ठ नागरिकाचे काम आहे.
कर्मचारी - तुम्ही कोण?

प्रतिनिधी - आम्ही पत्रकार आहोत.
कर्मचारी - आधी नाही का सांगायचे साहेब. हे बघा यात आमची चूक नाही. त्या देशपांडेंना अनेकवेळा मुख्यालयातून पत्र घेऊन यायला सांगितले.

प्रतिनिधी - कर कुठेही भरला तरी तो तुमच्याच कार्यालयाने घेतला ना. मग लोकांना का त्रास देता?
कर्मचारी - नळपट्टीचे काम जुन्याच पद्धतीने होते.

प्रतिनिधी - देशपांडेंनी आधी भरलेले पैसे तुमच्या रेकॉर्डवर नाहीत. या पावत्या बनावट तर नाहीत ना.
कर्मचारी -नाही, या पावत्या मनपाच्या आहेत. वॉर्डमध्ये फाडल्याने सर्व घोळ झाला. वॉर्ड अ कार्यालय मुख्यालयात आहे. तेथे जावून वॉर्ड अधिकार्‍यांना भेटा, रीतसर पैसे भरल्याचे लेखी पत्र आणायला त्या देशपांडेंना सांगा.

प्रतिनिधी - ही पावती मनपाची आहे ना. मग पत्र कशाला हवे?
कर्मचारी - ती आमची पद्धत आहे त्याप्रमाणेच काम करावे लागते. या रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी लागते.

तुम्ही वॉर्ड अधिकारी संपत जरारे यांना भेटा.

स्टिंग क्र.2 (वॉर्ड अ मुख्यालय मनपा)
प्रतिनिधी - हा कर भरायचा आहे. कुणी घेत नाही .
कर्मचारी -तुम्ही इकडे कसे आलात.तुमचा वॉर्ड ड आहे क्रांती चौकात आहे. तेथेच जाऊन तो भरावा लागेल.

प्रतिनिधी - हे ज्येष्ठ नागरिकाचे बिल आहे.
कर्मचारी - ते चुकून इकडे घेतले असेल .मार्च एन्डींगच्या गडबडीत कर्मचार्‍याने ते घेतले. आम्हाला तसे पत्र द्या.

प्रतिनिधी - आम्ही पत्रकार आहोत.हे एका ज्येष्ठ नागरिकाचे काम आहे.
कर्मचारी - बसा, मी काहीतरी करतो.मी तुम्हाला पत्रच बनवून देतो. फक्त वॉर्ड अधिकार्‍याची सही घ्यावी लागेल ते आताच येतील काही काळजी करू नका.

प्रतिनिधी - एका ज्येष्ठ नागरिकाला एवढा त्रास का देता.
कर्मचारी- आमची काही चूक नाही. पाणीपट्टी अजून ऑनलाइन व्हायची आहे. एक बिल दुसर्‍या वॉर्डात भरायला नको. आमच्या कर्मचार्‍यानेही ते घ्यायला नको होते.

प्रतिनिधी - तुमचे नाव काय.
कर्मचारी-शेख सलिमोद्दीन .मी रोखपाल आहे.

थेट सवाल: सखाराम पानझडे
कार्यकारी अभियंता, मनपा

0पाणीपट्टी लवकरच ऑनलाइन करणार
पाणीपट्टीसाठी नागरिकांना का वेठीस धरले जाते?
- सध्या पाणीपट्टीचे काम जुन्याच रजिस्टर पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणात एका वॉर्डाचे पैसे दुसरीकडे भरल्याने हा त्रास झालाय.
0 पाणीपट्टी भरायला लोक तयार आहेत तुम्ही घ्यायला तयार नाही.
- हा प्रकार चुकून झाला असेल. वॉर्ड ड चे पैसे वॉर्ड अ मध्ये घ्यायला नको होते. या चुकीची दुरुस्ती तत्काळ करतो. त्या ज्येष्ठ नागरिकाला मला समक्ष भेटायला सांगा.
0 मॅन्युअल पद्धतीने तारांबळ होतेय
- समांतर जलवाहिनी आल्यावर पाणीपट्टी ऑनलाइन होईल. तोपर्यंत तरी हा त्रास सगळ्यांनाच सहन करावाच लागणार आहे.


मला भयंकर मनस्ताप झाला
मी गेल्या आठ महिन्यांपासून खिशात बारा हजार रुपये घेऊन मनपा कार्यालयात पाणीपट्टी घ्या म्हणून चकरा मारतोय, पण कुणीच दाद दिली नाही. मला वॉर्ड अ ते वॉर्ड ड अशा अनेक चकरा रिक्षाने माराव्या लागल्या. मी सरकारी नोकरीत ऑडिटर होतो. महानगरपालिकेतही आमच्या कार्यालयाची फायनान्स ऑफिसरची पोस्ट आहे. त्यांनादेखील भेटलो, पण त्यांनीही याबाबतीत मला कुठलीही मदत केली नाही.

- मुकुंद देशपांडे, त्रस्त ज्येष्ठ नागरिक