नाव, धर्म, जन्म तारखेत बदल करायचा असल्यास शासकीय मुद्रणालयातील कर्मचारीच दलाल बनून लोकांना लुटत आहेत. येथे प्रवेश करताच सुरक्षा रक्षक सावज आल्यागत स्वत: तुमच्याजवळ येऊन चौकशी करतो आणि संबंधित लिपिकाकडे घेऊन जातो. हा लिपिक मग सौदा करतो. एका बदलासाठी दीड हजार रुपयांची मागणी होते. विशेष म्हणजे ही सुविधा ऑनलाइन असतानाही लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन येथे कशी खाबूगिरी होते त्याचे स्टिंग करून "डीबी स्टार'ने पितळ उघड केले. यात विभागातील काही लोक मिळून हे ‘उद्योग’ करत असल्याचे दिसते.
लांबलचक नाव, जुन्या पिढीतील नाव, इंग्रजीत नेहमी स्पेलिंग मिस्टेक होणारी नावे, वेडीवाकडी आडनावे बदलण्यासाठी नेहमीच गर्दी होते. नाव बदलण्यासाठी शासनाने www.dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे; पण बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. ही प्रक्रिया ज्यांना किचकट वाटते, ते शासकीय मुद्रणालयातच जातात. तिथे मात्र, वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागते.
ना. धों. महानोरांच्या सुनेलाही फटका
प्रख्यात कवी ना. धों. महानोर यांच्या दोन नातींच्या नावांमध्ये बदल करायचा होता. त्यांच्या स्नुषा सविता महानोर या शासकीय मुद्रणालयात गेल्या होत्या. त्यांनाही असाच अनुभव आला. नविद सय्यद याच लिपिकाने त्यांना दोन्ही मुलींच्या नावातील बदलासाठी अडीच हजारांची मागणी केली होती. हा प्रकार न पटल्याने मी नाव बदलणेच रद्द केल्याचे सविता महानोर यांनी सांगितले.
मिळून सारे जण?
सुरक्षा रक्षकापासून ही सर्व साखळी कार्यरत आहे. सर्रास पैसे मागितले जात असल्याने नविद सय्यदसह इतर कर्मचारीही यात सहभागी असावेत अशीही शंका येते.
पुढील स्लाइडवर वाचा, सुरक्षा रक्षकापासूनच लिंक