आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DB Star Team Mass Plantation Program In Dr. Babasaheb Ambedkar University

घोषणा-भजन, कीर्तनासंगे वृक्षारोपण; 2 हजार वृक्षप्रेमींनी 4 तासात लावली 8 हजार झाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेकड्यांचा परिसर, पावसाळी ऋतूमुळे कुंद असलेले वातावरण आणि सर्वत्र झाडे लावणारे हजारो आबालवृद्धांचे हात..डीबी स्टारच्या ग्रीन औरंगाबाद फोरमच्या वतीने व शहरातील विविध पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने आयोजित वृक्षारोपण महाअभियानातील हे दृश्य..विद्यापीठ परिसरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) आलेला हा विलक्षण अनुभव..चांगल्या कामासाठी कुणी हाक दिली तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हेच औरंगाबादकरांनी दाखवून दिले. 2 हजार लोकांनी 4 तासांत तब्बल 8 हजार झाडे लावली. यात थोड्याथोडक्या नव्हे, तर विविध क्षेत्रांत काम करणार्‍या 16 संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे हे महाअभियान अविस्मरणीय ठरले.

सामाजिक, आर्थिक बदल घडवण्याच्या दैनिकाच्या ध्येयानुसार डीबी स्टारने वृक्षारोपणाची हाक दिली आणि हजारो हात एकत्र आले. एकीकडे पर्यावरणप्रेमी घामाचे मोती पेरत होते, तर दुसरीकडे देशभक्तीपर गाणी, भजन, कीर्तन, पथनाट्याची सोबत वातावरणात उत्साह पसरवत होती. त्यामुळे हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरला.

शक्ती वाढली
पर्यावरणासाठी काम करणार्‍या अनेक संस्था, संघटना डीबी स्टार ग्रीन औरंगाबाद फोरमच्या छताखाली एकत्र आल्या आहेत. यामुळे आता झाडे लावण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी हातांची संख्या वाढली आहे. यामुळे येणार्‍या दिवसांत ग्रीन औरंगाबाद होईल. - वीरेंद्र भांडारकर, सहायक संचालक , भारतीय खेळ प्राधिकरण, औरंगाबाद

लाखो झाडे लावणार
सर्वत्र पर्यावरणाबाबत जागृती झाल्याने आता चालू वर्षात लाख झाडे लागतील. सर्वांच्या मदतीने हे अभियान पार पडले. यामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. यापुढे शहरातील प्रत्येक शाळेने यात सहभागी व्हावे. - संदीप नागोरी, समन्वयक, औरंगाबाद डेव्हलमेंट फोरम

भविष्यातील यशाची नांदी
डीबी स्टार ग्रीन औरंगाबाद फोरम म्हणजे उद्याच्या यशाची नांदी. यामुळे मोठय़ा संख्येने आम्ही यात आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला. जेणेकरून एकत्रित काम केल्याने प्रत्येकाचे हिरवे औरंगाबाद हे स्वप्न सत्यात उतरू शकेल. - प्रा. गोपीचंद चाटे, संचालक, चाटे समूह

सगळ्याच संस्थांनी पुढाकार घ्यावा
या अभियानात साई संस्थेने जसा पुढाकार घेतला तसा शहरातील इतर संस्थांनीही पुढे यावे. जेणेकरून शहरातील प्रत्येक टेकडी, डोंगर आणि प्रत्येक कोपरा हिरवागार होईल. - डॉ. दिलीप यार्दी

अनोखी योजना
कमिटमेंट टू नेचर या योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि त्याचे पालकत्व घेण्याची जबाबदारी रुजवण्यात आम्ही या निमित्ताने यशस्वी झालो. आधी एकटी काम करत होते आता फोरमच्या रूपाने अनेक सोबती मिळाले. - मनीषा चौधरी, दीपशिखा फाउंडेशन


आयोजन पाहून भारावून गेलो
या ठिकाणी आलेली प्रत्येक व्यक्ती पर्यावरणासाठी काम करत होती, हे पाहून मनस्वी आनंद झाला. डीबी स्टार ग्रीन औरंगाबाद फोरममुळे हजारो लोकांना, संस्थांना आणि आबालवृद्धांना प्रेरणा मिळाली. पुढील कार्यक्रमात आमचे विद्यार्थीदेखील सहभागी होतील. विजय पांढरीपांडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

विलक्षण आणि अविस्मरणीय.
‘साई’ परिसरात आल्यावर थक्क करणारा अनुभव आला. एकाच ठिकाणी इतक्या मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण, एकत्र आलेल्या अनेक संघटना, राबत असलेले अनेक हात आणि जोडीला गीत, संगीत,भजन, कीर्तन. सगळा विलक्षण अनुभव होता. वृक्षारोपणाच्या कार्यामध्ये आमचा पूर्ण सहभाग राहील. विक्रमकुमार. जिल्हाधिकारी, औरंगाबाद

उत्तम व्यवस्थापन
तरुण , शालेय विद्यार्थी, महिला आणि अधिकारी असे सगळेच या अभियानात सहभागी झाले होते. या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व थरांत नव्या हरित क्रांतीचा संदेश गेला. प्रत्येकाने जीवनात किमान एक तरी झाड लावावे. त्यातूनच खर्‍या अर्थाने औरंगाबादची ओळख ग्रीन औरंगाबाद होईल. या कार्यक्रमात परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता. त्या माध्यमातून झाडांचे महत्त्व जास्त उजागर झाले. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्तवृक्षांवर प्रेम
भजन, कीर्तन, भारुड म्हणजे देवावरील प्रेम व्यक्त करण्याची साधने आहेत. तसेच निसर्गावरील प्रेम म्हणजेच एक तरी झाड लावून ते जगवणे आहे. यामुळेच आम्ही झाडे लावा आणि भजन, कीर्तन यांचा समन्वय साधून भजनातून रोपे लावण्याचे समुपदेशन करतो. खंडुजी गायकवाड, गाडगेबाबा शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ, औरंगाबाद.

निसर्गसेवा हीच ईश्वरसेवा
आम्ही अनेक ठिकाणी भजने सादर करून देवाची आराधना करतो, पण या अभियानात हजारोंच्या सोबतीने भजन म्हणताना वेगळे समाधान मनाला मिळाले. पर्शिम करणार्‍यांना ऊर्जा देण्यासाठी आम्ही आलो होतो. निसर्गसेवा म्हणजेच एक प्रकारे ईश्वरसेवाच आहे याचाही प्रचिती आली. - बेबीताई मोरे, जती महारुद्र व गजानन महाराज महिला भजनी मंडळ

चांगली संधी मिळाली
फोरममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे औरंगाबाद शहरात सर्वत्र झाडे लावण्यात आम्हीही योगदान देऊ शकलो. पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार करू शकलो. हे समाधानाचे फळ खूप मोठे आहे.
सुनील सुतवणे संचालक, गरवारे कम्युनिटी सेंटर

मान्यवरांचा सहभाग
वृक्षारोपण महाअभियानात औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम, गरवारे कम्युनिटी सेंटर, दीपशिखा फाउंडेशन, चाटे स्कूल, त्रिमूर्ती हायस्कूल, ग्रीन थिंकर्स, पोलिस सैनिकी भरतीपूर्व संस्था, प्रयास यूथ फाउंडेशन, माहेश्वरी यूथ फाउंडेशन, संत गाडगे महाराज भजनी मंडळ, जती महारुद्र महिला मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ, ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम, विवेकानंद महाविद्यालय एनसीसी कॅडेट, शौर्य युवक प्रतिष्ठान आदी 16 संस्था व संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, नीता पांढरीपांडे, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, चाटे शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. गोपीचंद चाटे, दैनिक ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे, उपजिल्हाधिकारी सरिता सूत्रावे यांची उपस्थिती होती.