आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानमालकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, कामावरून कमी केल्याच्या रागातून केले कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - कामावरून काढल्याच्या रागात नाेकराने दुकानमालकाच्या मुलावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात घडली. आकाश स्वरूपचंद भळगटिया (२५ रा.बजाजनगर) असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक व्यापाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. 
 
नांदेड जिल्ह्यातील अनंत शेषराव ताटे (२१ रा.रांजणगाव शेणपुंजी) हा स्वरूपचंद भळगटिया यांच्या रेडिमेड कापड दुकानात दीड वर्षांपासून कामाला होता. दिवाळीची सुटी संपवून अनंतने पुन्हा कामाला सुरुवात केली होती. पाच दिवसांपूर्वी कापडाचा गठ्ठा बाहेरून आत घेऊन जाण्यावरून दुकानमालक स्वरूपचंद यांचा मुलगा आकाश याच्याशी अनंतचा वाद झाला. काम करण्यास नकार देणाऱ्या अनंतला, उद्यापासून तू कामावर येऊ नकोस म्हणून आकाशने सांगितले. हाच राग मनात धरून शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अनंत दुकानाच्या दिशेने आला. त्याने दुकानासमोरील फळविक्रेत्याच्या गाड्यावर नारळ कापण्यासाठी असलेला कोयता घेऊन दुकानात प्रवेश केला आणि पाठमोऱ्या असलेल्या आकाशच्या डोक्यात वार केला. 
दुसरा वार हातावर बसला.
 
तिसरा वार डोक्यात झाल्यामुळे आकाश गंभीर जखमी होऊन कोसळला. त्याच वेळी परिसरातील लोकांनी दुकानाकडे धाव घेऊन आरोपी अनंतला पकडून ठेवले. घटनेची माहिती फोनद्वारे वाळूज एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांना मिळताच त्यांनी हेडकाॅन्स्टेबल बाळासाहेब आंधळे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतले. गंभीर जखमी आकाशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
 
सर्व कृत्य सीसीटीव्हीत कैद 
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीच्या सर्व हालचाली त्याने आकाशवर केलेला जीवघेणा हल्ला कैद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली.
बातम्या आणखी आहेत...