आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळातून विषबाधा की सर्पदंश?, दोन मुलांचा मृत्यू, आईही अत्यवस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रात्री झोपण्यापूर्वी सफरचंद व चिकू खाल्ल्यानंतर मळमळ व उलटी होऊन दोन  बालकांचा मृत्यू व आईही अत्यवस्थ झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी पहाटे चार वाजता  घडली. दरम्यान, फळातून विषबाधा झाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा  दावा कुटुंबीयांनी केला  असला तरी सुरुवातीला सर्पदंशाची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. परंतु शेवटी  जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाही मृत्यूचे कारण कळत नसल्याने दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुलांच्या पोटातील अन्न नमुने व पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबाद प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.  
 
गोलंग्री (ता. बीड) येथील साखर कारखान्यावरील कामगार भारत शिंदे यांची मुले साई (२) व ओम (५) यांना बुधवारी पहाटे  राहत्या घरी मळमळ होऊन उलट्या झाल्या. काही वेळातच दोन्ही मुले अत्यवस्थ झाली.  पाठोपाठ पत्नी प्राजक्तालाही अत्यवस्थ वाटू लागल्याने तिघांनाही सकाळी सहा वाजता उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात आेम याचा  रुग्णालयात येताच मृत्यू झाला, तर साईचा सात तासांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारत यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूने त्यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे अतिदक्षता विभागात पत्नीची  तब्येत खालावत असल्याची चिंता आहे. दुपारपर्यंत मुलांच्या मृत्यूची बातमी प्राजक्ता यांना कळवण्यात आली नव्हती. पण दुपारी साईच्या मृत्यूनंतर ही बातमी त्यांना सांगण्यात आल्यावर त्यांच्यासह इतर नातेवाइकांनी सकाळपासून रोखलेल्या दु:खावेगाला वाट मोकळी केली. त्यांच्या आक्रोशाने परिसर सुन्न झाला होता. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...