आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जॉब फेअर’चा बोजवारा; 2500 तरुणांचा हिरमोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळ आणि मंदीचे सावट असतानाच नोकरी मिळेल अशा आशेने आलेल्या एमबीए, इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमाच्या सुमारे 2500 विद्यार्थ्यांचा शनिवारी हिरमोड झाला. ‘मराठवाडा जॉब फेअर-2013’ अंतर्गत देशभरातील 52 नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर नोकरीची संधी असल्याची जाहिरात करून केवळ फुटकळ जागांची भरती करण्यात आली. नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदाच्या जागा नव्हत्या आणि 24 कंपन्या गैरहजर होत्या.
सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर श्रेयस प्रतिष्ठान आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दोनदिवसीय नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तेथे सात तास थांबून मुलाखतीचा टेबलही न पाहायला मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आयोजकांविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. पाचशे जागांसाठी विद्यार्थी सकाळी 9 वाजेपासून जमले होते. मात्र उद्घाटनानंतर अक्षरश: धांदल उडाली. 52 कंपन्या मुलाखती घेण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन फोल ठरले. मुलाखतीची संपूर्ण तयारी करून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली येथून उच्चशिक्षित विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित होते. मुलाखतीचे सत्रही सुरू झाले. मात्र विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेल्या कंपन्याच या ठिकाणी हजर नव्हत्या. संयोजकांपैकी जे प्रतिनिधी नावनोंदणीसाठी आणि पैसे जमा करण्यासाठी आले होते ते दिसत नव्हते. त्यांचे फोनही बंद होते. याबाबत विद्यार्थी अधिकाºयांना विचारायला गेले तेव्हा त्यांनीही टाळाटाळ केली. जॉब फेअरसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली.

बड्या कंपन्यांची फक्त नावेच
व्हिडिओकॉन, बजाज अलायन्झ, डेक्कन होंडा, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, कॉस्मो फिल्म, गुडइयर, कॅन पॅक, विप्रो, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज, प्रीमियम ट्रान्समिशन, जीएपीएस पॉवर, इंड्युजर गिअर, मॅक्सलाइफ इन्शुरन्स, ग्लोबल वेब सॉफ्ट टेक्नॉलॉजी, सीटीआर, जैनएक्स आमकोल, एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन अशा 52 बड्या कंपन्यांची यादी देण्यात आली. प्रत्यक्षात यातील 28 कंपन्याच हजर होत्या.

जागाच नव्हत्या, ऑपरेटर, वायरमनची भरती
अनेक कंपन्यांमध्ये एमबीए आणि अभियांत्रिकीच्या पदासाठी जागाच नव्हत्या. या वेळी केवळ मशीन ऑपरेटर, वायरमन अशा जागांचीच भरती करण्यात आली.

239 विद्यार्थ्यांना नोकरी : संयोजक
मराठवाड्यातील आजवरचा सर्वात मोठा नोकरी मेळावा आयोजित करण्यात आम्ही यशस्वी झालो. शनिवारी मुलाखतीला सामोरे जाणाºया सुमारे 941 पैकी 239 विद्यार्थ्यांना नोकरीही मिळाली. पुढील मुलाखती 8 दिवस सुरू राहणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांला फोन करून मुलाखतीची तारीख देण्यात येईल. ज्या कंपन्या आल्या नाहीत त्यांना पुन्हा बोलावण्यात येईल. 52 कंपन्यांची आमच्याकडे लेखी संमती आहे. मात्र, काही कारणांमुळे कंपन्यांचे एचआर विभाग येऊ शकले नाहीत. त्या कंपन्यांशी बोलणे झाले आहे.’
- बसवराज मंगरुळे, अध्यक्ष, श्रेयस प्रतिष्ठान