आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी काम करीन म्हणालो अन् बाबांचे डोळे चमकले, प्रकाश आमटेंचा समर्पित प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७० ला मी आणि प्रकाश एमबीबीएस झालो. बाबांना भेटायला आनंदवनाला गेलो. तेव्हा त्यांनी सर्वांना सहलीला नेले. जंगलाची सफर घडवणारी ही सहल आम्हाला खूप आनंददायी होती. मात्र, दिवसांच्या प्रवासानंतर हेमलकसाला पोहोचलो. तिथले आदिवासी पाहून अक्षरश: सुन्न झालो. बाबा म्हणाले, आनंदवन आता स्थिर झालेय. मी इथे काम करीन म्हणतो. तेव्हा बाबा साठीकडे झुकले होते. मी २२ वर्षांचा होतो. मी म्हणालो, मी काम करीन इथे अन् बाबांचे डोळे चमकले. तो क्षण आजही अविस्मरणीय आहे. कारण, तो त्यांना जीवनाचे समाधान देऊन गेला. आयएमएच्या वतीने शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे बोलत होते.
प्रत्येक जनमानसात आकर्षणाचा विषय असलेल्या हेमलकसा, आदिवासी आणि डॉक्टर दांपत्याचा अनुभव प्रवास त्यांनी सहज सोप्या शब्दांत हळुवारपणे खुला केला तो त्यांच्याच शब्दांत आता माझे जीवनच सार्वजनिक झाले आहे. सुशिक्षित माणसांनी ज्यांना वाळीत टाकले त्यांच्यासाठी काम करण्याच्या उद्देशाने हेमलकसात गेलो होतो.
बाबांची कल्पनाशक्ती अफाट होती. ज्या जागा कुणीही पाहिल्या नाहीत तिथे त्यांना नंदनवन दिसले होते. "त्या' सहलीनंतर हेमलकसात जागेसाठी अर्ज केला. शासनाचे उपकार की अर्ज तत्काळ मान्य झाला नाही. त्यामुळे मंदा माझ्या जीवनात आली. तिने बाबांना शब्द दिला तो अखेरपर्यंत पाळला. यामुळे ते समाधानाने झाले. एवढेच नाही तर आमची तिसरी पिढी याच कामी जीवन सर्मपित करत आहे याचे मला समाधान आहे. ४२ वर्षे अतिशय आनंदाचा आमचा संसार झाला. आता बाबांच्या जयंतीनिमित्त ५० खाटांचे कोटी रुपयांचे हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यामुळे आदिवासींना खूप सोय होईल.
आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा सर्वच येत होते असे नाही. पण आल्या माणसाला परत पाठवले नाही. नातेवाइकांची परवानगी घेतली नाही, पण त्यांच्या डोळ्यांदेखतच ऑपरेशन केली. लोकांना वाचवू शकलो. यातून विश्वास मिळाला. या वेळी आयएमए अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, उपाध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ, सचिव डॉ. सचिन फडणीस आणि डॉ. मंदा आमटे यांची उपस्थिती होती. डॉ. संतोष रंजलकर यांनी सूत्रसंचालन केले.
सहसा बायोपिकला यश मिळत नाही. मात्र, माझ्या बायोपिकला मिळाले. यानंतर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत काम पोहचले. आजही हेमलकसात बलात्कार,स्त्रीभ्रुण हत्या होत नाहीत. गेल्या ४२ वर्षांत झाले नाही. त्यामुळे हा समाज जगाला खूप शिकवणारा आहे.