आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक; पाच कोटींच्या आॅफरची गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ते मंत्री झाल्यानंतरचा पहिला आरोप झाला तो मराठवाड्यातून. याबाबतीत का असेना, मराठवाडा सर्वात आघाडीवर राहिला   असे म्हणायला हवे. कन्नडचे शिवसेना आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी हा आरोप केला आहे. आपण शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात यावे, याच पक्षाकडून पोटनिवडणूक लढवावी, त्यासाठी होणारा खर्च भाजप करेल, अशी आॅफरच मंत्री पाटील यांनी आपल्याला दिली होती. पोटनिवडणुकीत पराभूत झालात तर विधान परिषदेवर घेण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले होते, असेही आमदार जाधव यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेला आम्ही वैतागलो आहोत आणि त्यांच्या जाचातून सुटका करून घ्यायची आहे, असे मंत्री पाटील आपल्याला सांगत होते, अशीही पुस्ती जाधव जोडतात. त्यावर मंत्री पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही; पण त्यांच्या पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आणि आमदार जाधव खोटे बोलत आहेत असे जाहीर करून टाकले. 


आमदार हर्षवर्धन जाधव खरे बोलत आहेत की खोटे, हे ते स्वत: आणि चंद्रकांत पाटील यांनाच माहिती. त्यामुळे त्या तपशिलात जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांना राजकारणात रस आहे आणि राजकीय परिस्थितीचे थोडे आकलन आहे त्यांना आमदार जाधव यांनी केलेल्या आरोपात काही धक्कादायक वाटले असेल, असेही नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेनेचे अमुक इतके आमदार तयार आहेत, अशा बातम्यावजा वावड्या गेल्या अनेक महिन्यांपासून कानावर येत आहेतच. त्याला जाधव यांनी वेगळ्या पद्धतीने पुुस्ती जोडली एवढेच. मराठवाड्यातल्या जनतेशी चंद्रकांत पाटलांचा फारसा संबंध आलेला नाही; पण आमदार जाधव यांना इथली जनता बऱ्यापैकी ओळखते. त्यामुळेही या बातमीने मराठवाड्यातल्या जनतेला तर मुळीच आश्चर्य वाटले नसेल.  हर्षवर्धन उत्साही आणि कार्यशील लोकप्रतिनिधींपैकी एक आहेत. पहिल्यांदा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमदारकी मिळाली. नंतर मनसे नेतृत्वावरच आरोप करून ते शिवसेनेत गेले. सध्या शिवसेनेचे आमदार असले तरी येणारी निवडणूक ते शिवसेनेच्याच तिकिटावर लढतील याची दोन महिन्यांपूर्वीपर्यंतही शाश्वती नव्हती. खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांचे टोकाचे मतभेद होते आणि त्यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे संकेत मिळतील, अशी तक्रारही हर्षवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यासंदर्भात त्या वेळी याच स्तंभातून सविस्तर लिहिलेही होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादला आले त्या वेळी आमदार असूनही ते कार्यक्रमाकडे फिरकलेही नव्हते ते याच वादातून. दोन महिन्यांपूर्वी उद्धव यांनीच खासदार खैरे आणि जाधव यांच्यात समेट घडवून आणला आणि तिकिटाचाही शब्द दिला. त्यामुळे अचानक हर्षवर्धन यांना शिवसेना ‘प्यारी’ वाटायला लागली आहे. ती किती दिवस प्यारी राहील, हे सांगता येत नाही. कारण खासदार खैरे यांना हा परवडणारा कार्यकर्ता नाही. कन्नडमधून आमदार करण्याच्या दृष्टीने उदयसिंग राजपूत यांना त्यांनी शिवसेनेत आणले आहे. खैरे आणि जाधव यांच्यात समेट झाल्याचे दाखवण्यात येत असले तरी मने जुळलेली नाहीत. शिवाय पक्षात आलेल्या उदयसिंग यांचे काय, हा प्रश्न आहेच. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेण्याची वेळ उद्या हर्षवर्धन यांच्यावरच येऊ शकते. असे झाले तर त्यांच्याकडे आता काँग्रेसकडून किंवा अपक्ष लढण्याशिवाय पर्याय नसेल. तसे होऊ नये म्हणून उद्धव यांच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी त्यांनी हे केले असावे, अशीही शक्यता आहे.  


एक बातमी अशीही आहे की, शिवसेनेतून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या आमदारांना भाजपमधूनच विरोध होतो आहे. कारण युती होणार नाही हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या मतदारसंघात आधीपासून भाजपने संभाव्य उमेदवार कामाला लावले आहेत. पुन्हा शिवसेनेचेच आमदार भाजपच्या तिकिटावर लढणार असतील तर पाच वर्षे त्या मतदारसंघात काम करून काय उपयोग, असा प्रश्न हे संभाव्य उमेदवार विचारतील. त्यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते आहे आणि म्हणून ते विरोध करीत आहेत. तसे नसते तर हर्षवर्धन जाधव कधीच भाजपमध्ये दिसले असते. वर्षभरापूर्वी जाधव यांनी नाराजीतून दुसऱ्यांदा आमदारकीचा राजीनामा दिला होता. तो उद्धव यांनी मागे घ्यायला लावला आणि नंतर खैरेंशी हर्षवर्धन यांचे बिनसले. ते मतभेद टोकाला गेले आणि हर्षवर्धन यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमांना जाणे सोडले. त्या वेळी भाजपकडून आॅफर गेली नसती तर या पक्षाला राजकारण कळतच नाही, असेच नसते का म्हणावे लागले? या प्रकारामुळे आपल्या उमेदवारीवरचे संकट टळले, याचा आनंद मात्र भाजपचे संभाव्य उमेदवार नक्कीच साजरा करीत असतील.  


- निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...