आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी, गुणपत्रिकेची मुंबईत होणार छपाई, गोपनीयता सुरक्षिततेला विद्यापीठाचे प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यूजीसीनॅकचे ‘अ’ मानांकन प्राप्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेसाठी कमालीची खबरदारी बाळगण्याचे ठरवले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे गोपनीयता पाळणाऱ्या तत्सम परवानाधारक एजन्सीलाच कंत्राट देण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईच्या एका कंपनीकडे हा परवाना असून त्यांच्या नावावर २८ सप्टेंबरच्या खरेदी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आधीपासूनच ‘अ’ मानांकन असलेले राज्यातील प्रतिष्ठाप्राप्त विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांचा बाजार मांडल्याचे प्रकरण सर्वांना ज्ञात आहेच. केवळ गोपनीयतेचा अभाव असल्यामुळे पदवी प्रमाणपत्र दुकानातून विक्री केल्यामुळे ‘त्या’ विद्यापीठाची बदनामी झाली होती. त्यामुळे यातून धडा घेत अत्युच्च दर्जाची सुरक्षितता आणि गोपनीयतेचे पालन करणाऱ्या कंपनीकडूनच मार्क्समेमो आणि पदवी प्रमाणपत्र छपाई करून घेण्याचा प्रस्ताव विद्यापीठासमोर आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी (२४ सप्टेंबर) खरेदी समितीची बैठक घेण्यात आली, त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे छपाई करून गोपनीयता अत्युच्च दर्जाची सुरक्षितता, खबरदारी बाळगणाऱ्या देशात फक्त सहा छपाई संस्था आहेत. त्यापैकी एक कंपनी मुंबई येथे आहे. या कंपनीला आगामी काळात गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांची छपाई करून पुरवठा करण्याचे काम देण्यात येणार आहे. ‘त्या’ कंपनीच्या सुरक्षिततेसंदर्भातच्या काही दस्तऐवजांची छाननी करून २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुरवठा खरेदी समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीला कुलगुरूंसह प्रभारी कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाट, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर हिवरे, वंदना हिवराळे आदींसह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.
आयएसएफचीहकालपट्टी होणार :विद्यापीठाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सध्या लेखराज सिंह यांच्या आयएसएफ कंपनीवर आहे. आयएसएफच्या सुरक्षा यंत्रणेवर विद्यापीठाने अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना सध्या ‘ब्रेक’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीसमोर आलेल्या सात एजन्सींपैकी दोन अपात्र ठरल्या आहेत. उर्वरित पाच एजन्सींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यात अन्सेक सिक्युरिटी, उत्तमसिंग पवार यांची मेडिएटर आणि ग्लोबल सिक्युरिटी सर्व्हिसेसचाही समावेश आहे. ‘उत्तम’ दर्जाची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.

कँटीनमधील राजकीय आखाड्याला टाळे
राजकीय,प्राध्यापक तथा विद्यार्थी कार्यकर्त्यांचा ‘अड्डा’ बनलेल्या मुख्य उपाहारगृहाला टाळे ठोकले जाणार आहे. त्यांचे कंत्राट रद्द करून या ठिकाणी केंद्रीय भांडारगृह उभारले जाणार आहे. शिवाय ‘लंच होम’ मध्ये उच्च दर्जाची सेवा पुरवणाऱ्या कँटीनला नेमण्यात येणार आहे. परिसरातील सर्व प्रकारच्या कँटीनच्या फेरनिविदा करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.