आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघे १५ पर्यटक घेऊन डेक्कन ओडीसी आली औरंगाबादेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तीन राज्यातील पर्यटनाचा शाही आनंद देणारी डेक्कन ओडीसी रेल्वे गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाली. ‘ज्वेल्स अॉफ डेक्कन’ या मार्गावरील पर्यटन स्थळांना भेट देत यातील पर्यटकांनी वेरूळच्या लेणी बघितल्या. या वेळी कैलास लेणीसमोर सुरू असलेली वेरूळ महोत्सवाची लगबग पाहून ते थबकले. आधी नियोजन झाले असते तर आम्हालाही महोत्सवाचा आनंद घेता आला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी अजिंठा लेणींना भेट देऊन ओडीसी मुंबईला परतीच्या प्रवासाला निघेल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जून २००४ पासून सुरू करण्यात आलेल्या डेक्कन ओडीसी रेल्वेचे कामकाज आता खासगी पर्यटन कंपनी कॉक्स अंॅड किंग्जतर्फे बघितले जाते. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील सहा मार्गावर ही रेल्वे धावते. यात महाराष्ट्र स्प्लेंडी, इंडियन ओडीसी, महाराष्ट्र वाइल्ड ट्रेल, हिडन ट्रेजर्स ऑफ गुजरात, इंडियन सोजर्न आणि ज्वेल्स ऑफ डेक्कन या टूर पॅकेजेसचा समावेश आहे. गुरुवारी शहरात आलेली ओडीसी ज्वेल्स ऑफ डेक्कन पॅकेजअंतर्गत आली होती.

क्षमता८८ अन् पर्यटक १५ : डेक्कनओडीसीतील कमाल २१ डबे प्रवाशांच्या संख्येनुसार कमी-जास्त केले जातात. ज्वेल्स ऑफ डेक्कनअंतर्गत औरंगाबादेत आलेल्या गाडीला ११ डबे आहेत. एका डब्यात रुम्स आहेत. त्यात दोन पर्यटक याप्रमाणे एकूण ८८ प्रवाशांची क्षमता आहे. प्रत्यक्षात अॉस्ट्रेलियन पर्यटकांसह यात केवळ १५ जणच आले आहेत. दिवस आणि रात्रीच्या प्रवासासाठी या पर्यटकांनी ३,६८,३५५ रुपये मोजले आहेत. रेल्वेत एसी, वायफाय, बार, स्पा, मसाज, डायनिंग हॉल, कॉन्फरेन्स हॉल, लाँज अशा सुविधा आहेत. मुंबई-बिजापूर-एेहोल-पट्टडकल-हम्पी-हैदराबाद-औरंगाबाद-वेरूळ-अजिंठा-मुंबई असा हा प्रवास आहे. गुरुवारी सकाळी गाडी अाैरंगाबादेत दाखल झाली. येथून हे पर्यटक वेरूळच्या लेणी बघण्यासाठी गेले. संध्याकाळी साडेसातला ते परतले. रात्री दहा वाजता रेल्वेने औरंगाबाद स्टेशन सोडून अजिंंठ्याला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. तर शुक्रवारी सकाळी ती जळगाव किंवा पाचोरा रेल्वेस्टेशनला थांबा घेईल. येथून पर्यटक दिवसभर अजिंठ्याच्या लेणी बघतील. संध्याकाळी साडेसहा वाजता रेल्वे मुंबईला रवाना होईल.

नियोजन असावे
^वेरूळला जाऊन वेरूळ महोत्सवाला मुकावे लागल्यामुळे पर्यटक नाराज होणे स्वाभाविक आहे. असे प्रकार टाळण्यासाठी वेरूळ महोत्सवासारख्या कार्यक्रमांचे खूप आधी नियोजन करायला हवे. ट्रॅव्हल्स कंपन्या महोत्सवांच्या तारखांवरून फेस्टिव्हल पॅकेज तयार करतात. अौरंगाबादेतील महोत्सवांचे असे कॅलेंडर तयार होणे गरजेचे आहे. -जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड, औरंगाबाद

पर्यटक झाले नाराज
गुरुवारी पर्यटक वेरूळ लेणी बघण्यासाठी गेले. येथे कैलास लेणीसमोर सुरू असलेली वेरूळ महोत्सवाची तयारी बघून आंतरराष्ट्रीय महोत्सव शहरात होत असून आपल्याला यापासून मुकावे लागल्याच्या भावनेने ते नाराज झाले. महोत्सवाचे आधी नियोजन झाले असते तर त्याप्रमाणे टूर काढता आला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...