आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delegation Without Meeting With Chief Minister Come Back

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना शिष्टमंडळ परत, सचिवांकडे दिले साता-याबाबतचे निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराच्या विकासासाठी निधी व सातारा-देवळाई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यासाठी मुंबईत गेलेल्या मनपाच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देणे टाळले. सचिवांकडे निवेदन द्यायला सांगत त्यांना वाटे लावले. दोन दिवसांआधी भाजप आमदार व पदाधिका-यांना भेट देत त्यांच्या एका निवेदनावर ३१ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने मनपाच्या पदाधिका-यांवर सरकारचा विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनपा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून निधी आणण्याचा आटापिटा सत्ताधा-यांनी सुरू केला आहे. त्यात शहरासाठी आपण किती प्रयत्न करतो हे दाखवण्याची शिवसेना, भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. मनपा पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार ६ तारखेची अपाॅइंटमेंट देण्यात आली होती. त्या दृष्टीने खासदार चंद्रकांत खैरे व महापौर कला ओझा यांनी नियोजनही केले होते. रस्त्यांसाठी निधी व सातारा- देवळाई मनपा हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी करणारे निवेदन तयार करण्यात आले होते; पण त्याआधीच भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत ३१ कोटींचा घसघशीत निधी पदरात पाडून घेत शिवसेनेवर तूर्त तरी सरशी केल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार अतुल सावे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दुसरीकडे निर्धारित भेटीसाठी महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते असद पटेल, अफसर खान, डॉ. जफर खान हे शिष्टमंडळ रवाना झाले.
मुंबईत खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्रीवर दाखल झाले असता त्यांना दुपारची अपॉइंटमेंट रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शक्य झाले तर सायंकाळी साडेसात वाजता भेट देतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे निवेदन देण्यास सांगितले. निधीच्या मागणीला अर्थच राहिला नसल्याने सातारा व देवळाईबाबतचे निवेदन परदेशी यांच्याकडे देण्यात आले. यानंतर उद्या शनिवारी मनपाची आरक्षण सोडत असल्याने हे पदाधिकारी औरंगाबादकडे रवाना झाले.

साता-याची मागणी
खासदार खैरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार योजना, रस्ते विकासासाठी प्राप्त अनुदान, सध्या महापालिका क्षेत्रात असलेल्या योजनेअंतर्गत सातारा देवळाई नगर परिषदेचा समावेश करून या योजनेअंतर्गत वाढीव निधी केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध करून घेऊन विकास करणे शक्य होईल. त्यासंबंधी महानगरपालिकेने ३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावही मंजूर केल्याचे त्यात म्हटले आहे.