आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदीनंतर राष्ट्रीयकृत पेक्षा खासगी बँका ग्राहकांना सुविधा देण्यात खूप पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटबंदीमुळे बँक ग्राहक वैतागले आहेत. विमनस्क अवस्थेतच ते बँकेत येत आहेत. या ग्राहकांशी प्रेमाने बोला. वाद, भांडणे अन् मारामारीसारखे प्रकार बँकेत अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांशी सौजन्याने वागला नाही तर चक्क निलंबित करू, अशी तंबीच सर्व खासगी बँकांच्या व्यवस्थापनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली आहे, तर सरकारी बँकांतील परिस्थिती अगदी याउलट असल्याचे चित्र आहे. खासगी बँकांनी ग्राहकांना दर्जेदार सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
शहरात २५ खासगी बँक तर राष्ट्रीयीकृत बँकांची १५ कार्यालये आहेत. “दिव्य मराठी’ने नोटाबंदीनंतर सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या बँकांच्या ग्राहकांना मिळणारी वागणूक, तेथील सुविधांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. सरकारी बँकांतील अधिकारी कर्मचारी ग्राहकाभिमुख नसल्याचे चित्र दिसले, तर खासगी बँकांत अधिकारी “कस्टमर डिलाइट’ देण्यात खूप पुढे आहेत, असे स्पष्ट झाले. नोटबंदीनंतर सरकारी बँकांत प्रचंड गर्दी झाली. पहिले दोन दिवस या बँकांनी ग्राहकांना स्वत:हून कोणत्याच सुविधा दिल्या नव्हत्या. दोन दिवसांनंतर काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी चहा बिस्किटांची सोय केली, पण बहुतांश सरकारी बँकांत अजूनही ग्राहकांना रांगेतच उभे राहावे लागते. एसबीआय, महाराष्ट्र बँकेच्या काही शाखांत ग्राहकांना बसण्यासाठी जागा अन् चहापानाची व्यवस्था आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शहागंज शाखेत ग्राहकांचा अधिकाऱ्यांशी वाद, लांब रांगा, बसण्यासाठी अपुरी जागा, चहा पाणी तर सोडाच कर्मचाऱ्यांचे खोचक अन् उद्धट बोल ऐकून भांडणाचे प्रकारही घडले आहेत.

खासगी बँकांकडून प्रेमळ वागणूक : खासगीबँकांत ग्राहकांची संख्या राष्ट्रीयीकृत बँकांइतकी मोठी नसली तरी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना लेखी पत्र पाठवून आरबीआयची नियमावली पाळा, ग्राहकांशी वाद टाळा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांनी कितीही अपमान केला तर उलटून बोलू नका, ग्राहकाच्या तुमच्याविषयी तक्रारी आल्या तर निलंबित व्हाल, अशा लेखी सूचना केल्या. शिवाय बँकांत ग्राहकांना बसल्या जागी पाणी, चहा, कॉफी, बिस्कीट आणि चॉकलेट दिले जात आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या काही शाखांत ग्राहकांसाठी चहापानाची व्यवस्था असली तरी ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळेल की नाही, हा मुद्दा अनुत्तरित आहे. नोटाबंदीपूर्वीही सरकारी बँकांकडून चांगली वागणूक दिली जात नव्हती, हे सर्वश्रुत आहे.
येसबँकेत चॉकलेट : जालनारोडवर गेल्या दहा वर्षांपासून येस बँकेची शाखा कार्यरत आहे. बँकेचे शहरात बारा हजार ग्राहक आहेत. तेथे पन्नासवर ग्राहक नसले तरी त्यांना चहा पाणी तर देतोच. शिवाय प्रत्येकाला चॉकलेट देतो. तसेच ज्या ग्राहकाला मोठी कॅश भरावयाची आहे त्यांना घरपोच सेवा दिली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डीसीबीबँकेतली अनोखी सिस्टिम : चुन्नीलालपेट्रोल पंपाशेजारी डीसीबी बँक आहे. बँकेकडे सुमारे तीस हजार ग्राहक आहेत. एका दिवशी करंट अकाऊंट असणाऱ्या ग्राहकाला पन्नास हजार तर सेव्हिंग्ज अकाऊंट असणाऱ्या ग्राहकाला आठवड्याला चोवीस हजार दिले जात आहेत. त्यामुळे तो ग्राहक आठवडाभर बँकेत येत नाही. प्रत्येक ग्राहकाला बिस्कीट आणि कॉफी किंवा चहा दिला जात आहे.

अॅक्सिसबँकेत वातानुकूलित वातावरण : अॅक्सिसबँकेत सर्वच ठिकाणी सेंट्रलाइज वातानुकूलित यंत्रणा आहे. कुठेही सेक्युरिटी गार्ड नाही. ग्राहक चकचकीत स्टीलच्या खुर्चीवर बसलेले दिसले. येथे ग्राहकांना कोणताही त्रास नाही, अशी माहिती संजय कुलकर्णी या ज्येष्ठ नागरिकाने दिली.
आयसीआयसीआयमध्येमुबलक नोटा : आयसीआयसीआयबँकेच्या अदालत रोडवरील मुख्य शाखेत पन्नास ते पंचावन्न हजार खाती आहेत. या शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आरबीआयची नियमावली काटेकोरपणे पाळली. आमच्या बँकेत कोणताही वाद झाला नाही. होतही नाही, कारण आम्ही ग्राहकांच्या वेगळ्या रांगा केल्या आहेत. गरोदर महिला, दिव्यांगांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ज्येष्ठ नागरिक, पैसे काढणारे आणि भरणाऱ्यांची वेगळी रांग केली जाते

निधीमुळे अडचण
^बँकेकडेनिधीची कमतरता आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी अडीच ते पाच हजार रुपयांचे वितरण केले आहे. इतर ठिकाणांवरूनही कॅश मागवली आहे. आम्ही आर.बी.आय. कडून येणाऱ्या कॅशची वाट पाहत आहोत.
आर.डी. सोनजे, मुख्य प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र..

एटीएममध्ये खडखडाट
शहरातील ७०० एटीएमपैकी १७५ एटीएम सुरू आहेत. यात एसबीआय, एसबीएच, अॅक्सिस, एचडीएफसी अँक्सिस बँकेचा समावेश आहे.

कॅशअभावी बँकांची तारांबळ कायम
शहरात बँकांकडे कॅश नसल्यामुळे नोटा वितरणावर परिणाम होत आहे. सोमवारी तर चक्क अडीच ते दहा हजार रुपयेच बँकांनी वितरित केले. एसबीआयमध्ये २४ हजार रुपये दिले जात आहेत. दरम्यान, बुधवारी आरबीआयकडून कॅश मिळण्याची शक्यता बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...