आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोम्बिंग ऑपरेशन सुरू; तरी डेंग्यूचा तिसरा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेंग्यूग्रस्त शहरात महापालिकेचे कोम्बिंग ऑपरेशन गती पकडत असतानाच डेंग्यूने आज तिसरा बळी घेतला. एकतानगरमधील भास्कर वाघ (वय 38) यांचे एमजीएम रुग्णालयात निधन झाले. त्यांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे एमजीएमने सांगितले. यामुळे मनपाला शहरभर मोहीम व्यापक करावी लागणार आहे.

एक महिन्यापासून शहरात पाय पसरत असलेल्या डेंग्यूच्या साथीने दोन दिवसांपूर्वी स्वराज कुंटे व अश्विनी बोलकर या दोघांचा बळी घेतला. दोघेही एन-11 भागातील असल्याने त्या भागात तातडीने महापालिकेने मोहीम हाती घेतली. याशिवाय शहरभर कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले असून सहाही वॉर्डात मिळून 497 कर्मचारी, स्वयंसेवक या कामात जुंपले आहेत. ही मोहीम सुरू असतानाच रविवारी आणखी एका व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने शहरवासी हादरले आहेत. एकतानगर वॉर्डातील भास्कर वाघ यांचा आज एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. एमजीएमच्या डॉ. अपर्णा कक्कड यांनी वाघ यांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.

वाघ यांचे रुग्णालयात आणण्याआधीच निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती नगरसेविका ज्योती वाघमारे यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांना दिली. या संदर्भात अहवाल तपासूनच भाष्य करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी एकतानगर भागात आधीच धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात आली होती, उद्या त्या भागात अधिकारी पाठवून तपासणी केली जाईल, असे सांगितले.

मोहिमेला वेग
दुसरीकडे महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम आज सहाही वॉर्डात राबवण्यात
आली. आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले की, आज 497 जण या मोहिमेत सहभागी झाले होते. आज जवळपास 40 हजार घरांना भेटी देण्यात आल्या. जवळपास एक हजार घरांत डासांनी पाण्यात अंडी घातल्याचे समोर आले. त्यामुळे त्या भागात व परिसरात अ‍ॅबेटचे वाटप करण्यात आले. पाणी सांडून देण्यात आले. धूर फवारणी, औषध फवारणी, अ‍ॅबेट वाटप करण्यात आले. ज्या भागात या मोहिमेची एक फेरी पूर्ण झाली तेथे दुस-यांदा ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे डासांच्या पैदाशीची ठिकाणे नष्ट केली जातील.
आयुक्तांची भेट
आयुक्त डॉ. कांबळे यांनी आज सकाळी सहा वाजताच एन-11 भागाला भेट देत या मोहिमेची पाहणी केली. कर्मचा-यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, या भागात सहा फॉगिंग मशीनच्या साहाय्याने फवारणी करण्यात आली. ही मोहीम योग्य तºहेने राबवण्याच्या आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले की, आठवडाभर ही मोहीम राबवली जाणार असली तरी त्याचे परिणाम तीन-चार दिवसांत दिसतील.
भीतीचे वातावरण : आतापर्यंत सिडको-हडको परिसर खासकरून एन-9 व एन-11 भागातच डेंग्यूचा अधिक फैलाव झाल्याचे सांगितले जात होते. पण आता एकतानगरात हा प्रकार घडल्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. नगरसेविका ज्योती वाघमारे यांनी सांगितले की, वाघ यांना चार-पाच दिवसांपासून ताप येत होता. आज त्यांना एमजीएममध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. वाघ हे एका खासगी कंपनीत काम करीत. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.