आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या हवामानाने देशात डेंग्यू, मलेरियाचा उच्छाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा जानेवारीच्या प्रारंभापासून ते एप्रिलपर्यंत झालेली गारपीट, अवकाळी पाऊस तसेच सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये वाढलेले तापमान यामुळे भारतात कीटकांकडून होणाऱ्या रोगांत वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार देशांत बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, फलेरिया, मलेरिया, मेंदूज्वर, चिकुनगुन्या या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बदलते हवामान डासांसाठी पोषक असल्याने या रोगांचा संसर्ग देशात वाढतो आहे. लान्सेट कमिशन, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनेही यास दुजोरा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे भारतात चावा घेणाऱ्या कीटकांकडून पसरणाऱ्या (व्हेक्टर बॉर्न डिसीज ) रोगांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. यात डेंग्यू, मलेरिया, फलेरिया, मेंदूला येणारी सूज आणि चिकुनगुन्या यांचा समावेश आहे. वाढते जागतिकीकरण, अनियोजित शहरीकरण आणि पर्यावरणातील बदल यामुळे काही डेंग्यू, चिकुनगुन्या आणि वेस्ट नाइल व्हायरस आदी रोगांना बळ मिळते आहे.

डेंग्यूचा वाढता विळखा
देशात गेल्या पाच-सहा वर्षांपासून डेंग्यूचा विळखा वाढतो आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २००९ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत डेंग्यूमुळे देशात १०११ मृत्यू झाले आहेत. यंदा सप्टेंबर २०१५ पर्यंत दिल्लीत सर्वाधिक ५९८२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

डासांसाठी राज्यातील तापमान पोषक
आपल्याकडे बदलत्या वातावरणाचा फारसा परिणाम डासांच्या संख्यावाढीवर होत नाही. मात्र साचलेले पाणी, उघडी डबकी, सांडपाणी यांच्यामुळे डासांची प्रजोत्पत्ती वाढते. डासांच्या चांगल्या वाढीसाठी २८ ते ३५ अंश सेल्सियस तापमान पोषक आहे. महाराष्ट्रात हिवाळा व पावसाळ्यात असे तापमान बहुतेक ठिकाणी असते. त्यामुळे डासांची संख्या वाढते.
-डॉ. अविनाश कुलकर्णी, प्रमुख, हिवताप निर्मूलन विभाग, औरंगाबाद

कक्षा रुंदावली
हवामानबदलविषयक शासकीय संघटनेनुसार (आयपीसीसी) अनेक रोगांनी त्यांची भौगोलिक कक्षा रुंदावली आहे किंवा तीत बदल होत आहे. मलेरियासारखे आजार देशाच्या मध्य भागातून नैऋत्य आणि उत्तर भागातील राज्यात फैलावत आहेत. भारत २०३० ते ५० या काळात मलेरियाची राजधानी म्हणून ओळखला जाईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...