आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर डासमुक्त ठेवण्यासाठी सिट्रोनेलाचा सुगंध उपयुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डेंग्यू, मलेरिया आणि चिकुन गुनियासारख्या आजारांचे कारण डास आहेत, हे आता नव्याने सांगावे लागत नाही. त्यामुळे डासांना रोखण्यासाठी घराघरात रसायनमिश्रित साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मात्र, या साधनांचा सतत वापर केल्यामुळे त्या रसायनांच्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. सिट्रोनेलाच्या सुगंधामुळे डास तर दूर जातातच; पण कोणतेही दुष्परिणाम त्यापासून होत नाहीत हे तज्ज्ञांनीच स्पष्ट केल्यामुळे सिट्रोनेलाचा वापर वाढत चालला आहे.

सिट्रोनेला हे एक गवत आहे. त्याच्या तेलापासून आता अत्तर, स्प्रे, साबण, सौंदर्य प्रसाधने आणि औषधेही बनवली जाऊ लागली आहेत. अनेक कंपन्या सिट्रोनेला गवताचे तेलही बाजारात विकू लागल्या आहेत. हे तेल शरीरावर लावल्यामुळे डासांपासून बचाव करता येतो, असे आयुर्वेदाच्या जाणकारांनी सांगितले. या तेलामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सिट्रोनेला तेल गवताची पाने आणि सालांपासून काढले जाते. ते डासरोधक तर आहेच; पण सर्वसाधारण संसर्गजन्य आजार आणि तापावरही ते परिणामकारक ठरते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मेणबत्तीचाही होतो उपयोग
या तेलात भिजवलेली मेणबत्ती जळत असेल तरीही डासांवर परिणाम होतो आणि डास तिथे येत नाहीत, असेही प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात पाऊस पडत असताना पेटवलेल्या विद्युत दिव्याभोवती अनेक किडे आणि कीटक गोळा होतात. त्यांच्यावरही सिट्रोनेलाचा सुगंध परिणाम करतो. हा सुगंध पसरताच अशा दिव्याभोवतीचे हे कीटक तिथून दूर जातात. तज्ज्ञांनी सांगितले की, अनेक ठिकाणी या सिट्रोनेलाचा स्प्रे रूम फ्रेशनर म्हणूनच वापरला जातो.

सिट्रोनेला गवत
सिट्रोनेला गवतात औषधी तत्त्वे असतात. ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. त्याच्या फुलांचा रंग जांभळा असतो. सर्वसाधारण डासांबरोबरच डेंग्यूच्या डासांवरही (स्वच्छ पाण्यावर राहणारे) हा सुगंध परिणाम करतो, असा दावाही तज्ज्ञांनी केला आहे. या गवतात जिवाणूनाशक तत्त्वेही असल्याचा दावा आयुर्वेदतज्ज्ञांनी केला आहे.