आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूमुळे शाळकरी विद्यार्थ्याचा अंत मुकुंदवाडीतील हृषीकेशचा मृत्यू, बळींची संख्या ९

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेंग्यूच्या साथीने आणखी एका बालकाचा बळी घेतला असून आज सकाळी मुकुंदवाडीतील हृषीकेश भगवानराव ढवळे या १४ वर्षीय बालकाची १२ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली. त्याच्या मृत्यूमुळे डेंग्यूने घेतलेल्या बळींची संख्या ९ वर पोहोचली आहे.
एन-९ आणि एन-११ नंतर डेंग्यूच्या साथीने मुकुंदवाडी, चिकलठाणा भागाला विळखा घातला आहे. गेल्याच आठवड्यात नगरसेविका सविता घडामोडे आणि त्यांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने धूत रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर या भागावर फोकस करणारी मोहीम सुरू करण्याचे निर्देशही दिले होते.
बागेत गेला आणि फणफणला : भगवान ढवळे हे एका कंपनीत मार्केटिंगचे काम करतात. त्यांना मुलाच्या जाण्याचा धक्का बसला आहे. भगवान यांना दोन मुले असून हृषीकेश सर्वात धाकटा होता. १४ आॅगस्ट रोजी हृषीकेश जयश्री काॅलनीतील बागेत खेळायला गेला होता. सायंकाळी तो परतला तो ताप घेऊनच. तापाने फणफणलेल्या अवस्थेत त्याला जवळच्याच डाॅ. सावंगीकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले. चार दिवसांनी ताप उतरला आणि त्याला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा ताप आला. ताप सारखा कमी-जास्त होत होता. दरम्यान, मुकुंदवाडीच्याच ज्ञानज्योत शाळेत नववीच्या वर्गात शिकणारा हृषीकेश शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचा. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच शाळेतील सगळेच जण हेलावले. शाळा सोडून देण्यात आली. त्याच्या मुख्याध्यापिका अनिता शिंदे यांना बोलतानाही रडू येत होते.
शाळेशेजारी भंगाराचे गोदाम
हृषीकेश ज्या ज्ञानज्योत शाळेत शिकतो त्या शाळेशेजारी भंगाराचे गोदाम आहे. ते भंगाराने ओसंडून वाहते. या शाळेतील मुले तशाच अस्वच्छ वातावरणात शिकत असतात. हृषीकेशच्या मृत्यूनंतर मनपा खडबडून जागी झाली आणि शाळा सोडून देण्यात आल्यावर तातडीने फाॅगिंग केले.