आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूची यंदा दोन महिने आधीच एंट्री; औरंगाबादेत दोन पॉझिटिव्ह रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दरवर्षी ऑगस्टनंतर दिसणार्‍या डेंग्यूची यंदा दोन महिने अगोदरच एंट्री झाली आहे. घाटीसह अनेक रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. गॅस्ट्रो, न्यूमोनिया, व्हॉयरल फ्लू, दम्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. या वर्षी वेळेवर पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे साथीच्या रोगांनाही सुरुवात झाली, असे सध्याचे चित्र आहे.

घाटीत सहा डेंग्यूसदृश रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी झाली. यात मुकुंदवाडीत राहणार्‍या एका महिलेला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत घाटीमध्ये गॅस्ट्रोचे सहा रुग्ण असून, एका स्वाइन फ्लू संशयित रुग्णाच्या लाळेचा नमुना पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये पाठवण्यात आला. हा अहवाल तीन ते चार दिवसांत येईल, असे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी सांगितले. शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी, गेल्या 15 दिवसांमध्ये डेंग्यूचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगितले. डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही जास्त आहे. विशेष म्हणजे डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये शहरातील रुग्णांचाही समावेश आहे. सध्या बाह्यरुग्ण विभागात गॅस्ट्रो व श्वसनविकारांचे रुग्ण सर्वाधिक आहेत. तसेच न्यूमोनिया, दमा, व्हॉयरल फ्लू, थ्रोट इन्फेक्शनचे रुग्णही वाढल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जाधव यांनीही डेंग्यूचे दोन-तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगितले. शाळा सुरू झाली आणि व्हॉयरल फ्लू, न्यूमोनियाचे रुग्ण वाढल्याचे त्यांनी सांगितले. चिकित्सक डॉ. समिध पटेल व डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनीही डेंग्यूसदृश रुग्ण दिसून येत असल्याचे सांगितले. तर, चिकित्सक डॉ. आनंद देशमुख यांनी साथरोगांना सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले. इन्फ्ल्युएंझा व न्यूमोकोकल लसीद्वारे न्यूमोनियाचा त्रास कमी करणे शक्य असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.