आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचे थैमान; महापौर ओझा मात्र दवाखान्यांच्या परवानगीत व्यस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात तीन जणांचे बळी घेत डेंग्यूची साथ झपाट्याने पसरत असताना महापौरांनी डेंग्यूविरोधी मोहिमेबाबत बैठक घेण्याऐवजी शहरातील रुग्णालयांच्या परवानगीसाठी डॉक्टरांची बैठक घेतली. आतापर्यंत महापौरांनी डेंग्यूविरोधी मोहिमेच्या शुभारंभापुरतीच हजेरी लावली असून ना पाहणी दौरे केले ना आरोग्य विभागाच्या बैठका घेतल्या.

गेल्या महिनाभरापासून पसरत असलेल्या डेंग्यूच्या साथीमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. एकापाठोपाठ एक तीन रुग्णांनी प्राण गमावल्यानंतर या भीतीत वाढच झाली आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी मोहीम हाती घेऊन काम सुरू केले आहे; पण एकूणच या डेंग्यूच्या प्रकरणात महापौर कला ओझा यांनी दूर राहणेच पसंत केले आहे. एन-11, एन-9 सह सगळ्या शहरात डेंग्यूच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू असताना महापौरांनी शुक्रवारी तेवढी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहराच्या कोणत्याही भागाचा दौरा केला नाही की बैठक घेतली नाही. उलट आज त्यांनी नोंदणीच्या प्रश्नाबाबत शहरातील डॉक्टरांची बैठक घेतली. मागील दोन वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या प्रश्नाबाबत त्यांनी आज तातडीने बैठक बोलावली. त्यात डेंग्यूविरोधी मोहिमेच्या प्रमुख डॉ. संध्या टाकळीकर यांनाही बोलावण्यात आले होते.

2012 पासून शहरातील 70 नर्सिंग होमच्या परवानगीचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. नगररचना विभागाच्या आक्षेपांचे कारण सांगत हे नोंदणीचे काम थांबवण्यात आले आहे. याबाबत शहरातील डॉक्टरांनी काल हापौरांनी आज तातडीने बैठक बोलावून या प्रश्नावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान नर्सिंग होमची परवानगी हा फक्त आरोग्य विभागाचाच विषय असून त्यात इतर विभागांच्या आक्षेपांचा विषय न घुसडता हा विषय मार्गी लावण्याबाबत महापौरांनी सकारात्मक भूमिका घेतली व आयुक्तांसोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचे ठरले. या बैठकीत डॉ. प्रदीप बेंजरगे, डॉ. अविनाश येळीकर यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शहरप्रमुख राजू वैद्य, सभागृह नेते किशोर नागरे यांचीही उपस्थिती होती.

सभापतींना पुन्हा डावलले : ही बैठक बोलावण्यात आली तेव्हा स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे मनपात त्यांच्या दालनात बसून होते. त्यांना या बैठकीला बोलावण्यात आले नाही. महापौरांच्या बैठकीला सभापतींना न बोलावण्याचे प्रकार वारंवार घडत असून आज त्यात आणखी एकाची भर पडली. याबाबत काही बोलण्यास वाघचौरे यांनी नकार दिला व आपण मनपातच होतो, असे सांगितले.