आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथ आटोक्यात येईना; पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडकोतील एन-11, एन-9 भागातील डेंग्यूच्या साथीला आळा बसवण्यात अद्याप तरी मनपाला यश आले नसून या भागातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एन-9 मधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.

शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर मनपा प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून शहराच्या सहाही वॉर्डात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. आगामी दीड आठवड्यात शहरातील अडीच लाख घरांपर्यंत जात मनपाची पथके औषध फवारणी, धूर फवारणी, अ‍ॅबेट वाटप आदी उपाययोजना करत आहेत. असे असले तरी डेंग्यूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून ही बाब चिंतेची बनली आहे. शिवसेनेचे नगरसेवक अनिल जैस्वाल यांनी सांगितले की, एन-9 भागातील शिवनेरी कॉलनीत राहणा-या 14 वर्षांच्या विपुल नरेश चोरडिया याला डेंग्यूची लागण झाली आहे.
त्याच्यावर लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला गेल्या तीन दिवसांपासून सतत ताप येत होता. त्याची डेंग्यूची चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर आता डॉक्टरांनी डेंग्यूचे उपचार सुरू केले आहेत.
फवारणी नाही
जैस्वाल म्हणाले, वॉर्डात गेल्या दहा महिन्यांत फवारणी ठेकेदाराने केलेली नाही. तरीदेखील त्याला बिले देण्याच्या हालचाली मनपात सुरू आहेत. फवारणीच्या खासगी ठेकेदारांमुळेच डेंग्यूची समस्या वाढली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. काँगे्रसचे राजेंद्र दाते पाटील यांनीही औषध फवारणीच्या ठेकेदारांच्या एकूणच सगळ्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.