आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका प्रीती तोतलांना डेंग्यू;शहरात उडाला स्वच्छतेचा बोजवारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुलमंडी वॉर्डाच्या नगरसेविका प्रीती तोतला यांना डेंग्यू आजार झाला असून खासगी रुग्णालयात त्या उपचार घेत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइनसुद्धा फुटल्या आहेत. जागोजागी कचरा पडला असून नाल्यांची स्वच्छता करण्यात येत नाही. फवारणीही केली जात नसल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे पालिकेतील पदाधिकार्‍यांना रोग जडत असताना सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छतेवर भर देऊन पंधरा दिवसांत नालेसफाईचे काम करण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले होते. परंतु सध्याची शहराची परिस्थिती पाहता त्यांचे आश्वासन हवेत विरल्याचे दिसते. शहराच्या स्वच्छतेवर वर्षाला 38 कोटी रुपये खर्च होतात. 1400 कर्मचारी काम पाहतात, कचरा उचलण्यासाठी 114 लहान-मोठी वाहने आहेत. मात्र तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नाल्यातील गाळ काढण्यात आलेला नाही.

भाजीपाला आणि इतर व्यावसायिक, गृहिणी नाल्यातच कचरा आणूण टाकतात. त्यामुळे उन्हाळ्यातच डेंग्यूसारखे आजार पसरत आहेत. याबाबत आयुक्तांना विचारले असता, परिस्थितीची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.