आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर डेंग्यूच्या कवेत, १५ दिवसांत २५ संशयित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एडिसइजिप्ती डासामुळे होणारा डेंग्यू पाहता पाहता शहरात आपले प्रस्थ वाढवत आहे. शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी झाली आहे. विशेषत: लहान मुलांची संख्या मोठी आहे. मनपा प्रशासन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र ते नागरिकांच्या प्रतिसादाशिवाय तोकडे पडत असल्याचे चित्र शहरातील सर्व भागांतील रुग्ण पाहताना येते.
शहरात मागील पंधरा दिवसांत २५ डेंग्यू संशयित रुग्ण अाढळले आहेत, तर १२ जणांच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मयूर पार्क, सुरेवाडी, जाधववाडीतील रुग्णांचा समावेश आहे, असे मनपा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या सिग्मा रुग्णालयात प्रज्योत संचेती आणि मंदार पटवर्धन हे दोघे रुग्ण दाखल आहेत. प्रज्योत वर्धमान रेसिडेन्सीचा रहिवासी आहे, तर मंदार चेतनानगरचा. याशिवाय रामनगरात दोन रुग्ण आहेत. भगतसिंगनगरमध्ये गीतार्थ जावळे आणि आदित्य जावळे यांना डेंग्यूमुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अनिता थोरात यादेखील रुग्णालयात दाखल आहेत. शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय आहे. मनपा आरोग्य विभागाच्या डॉ. मनीषा भोंडवे म्हणाल्या, एडिस इजिप्ती स्वच्छ पाण्यावर वाढतो. शक्यतो दिवसा चावा घेतो. घरात वापराचे पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे. तीन-चार दिवसांनी एकदा सर्व भांडी कोरडी करून घ्यावीत. दिवसा डास चावू नये यासाठी डासनाशकांचा वापर करावा. पूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरावेत.

दोन बालकांना डेंग्यू
चिकलठाण्यातील आठ वर्षीय मुलगा इमाद इक्बाल शेख आणि त्याची एकवर्षीय बहीण उम्मे ऐमन इक्बाल शेख यांना डेंग्यू झाला आहे. या दोघांवर जुलेखा हॉस्पिटल, रोशन गेट येथे उपचार सुरू आहेत. साताऱ्यातील प्रदीप मापारी (२०) यांनाही डेंग्यू झाला आहे. विशेष म्हणजे याबाबत मनपाचा मलेरिया आणि आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे.
बातम्या आणखी आहेत...