आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Department Of Drama To Help Drought Affected Area

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हातः 'कथा खैरलांजीची'चा प्रयोग 8 एप्रिलला, दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळी निधीला हातभार लागावा यासाठी उद्योजक, व्यापारी, नोकरदारांसह आता रंगकर्मीही सरसावले आहेत. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने 'कथा खैरलांजीची' या दोन अंकी व्यावसायिक नाटकाची निर्मिती केली आहे. यातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे. 8 एप्रिल रोजी कलानगरी कोल्हापूरपासून या नाटकाचा व्यावसायिक दौरा सुरू होणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ.शशिकांत बर्‍हाणपूरकर यांनी दिली.

नाटकात खैरलांजीची घटना हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. घटनेनंतर न्यायालयाने दिलेला निणर्याचा भागही नाटकात दाखवण्यात आला आहे. लेखकाने आतिशय नाजूकपणे हा विषय हाताळला आहे. नाटक कुठल्याही पद्धतीने वादग्रस्त होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नाट्यमहोत्सवात 2500 प्रेक्षकांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकाचा शेवट शांततेच्या संदेशाने केला आहे. नाटकाचे लिखाण आणि दिग्दर्शन अनिलकुमार साळवे यांनी केले आहे, तर निर्मितीसाह्य साहेबराव पाटील यांनी केले आहे. 25 कलाकारांच्या या चमूला विभागप्रमुख बर्‍हाणपूरकर मार्गदर्शन करत आहेत. सध्या या नाटकाची तालीम आता अंतिम टप्प्यात आहे.

साहेबराव पाटील, अनिलकुमार साळवे, जितेंद्र बोरसे, सिद्धेश्वर थोरात, अभिमन्यू राजगुरू, ज्योती गंगावणे, सद्दाम शेख, सुजित देठे, रामदास राठोड,मंगेश तुसे, रावसाहेब थेटे, प्रकाश मगरे, परमेश्वर शिंदे, सुचीत्ना लोंढे यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर संगीत रामदास सांगळे, पार्श्वगायन मंगलसिंग सोळुंके, वेशभूषा संतोष कुलकर्णी यांची आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागानाही यासाठी सहकार्य केले आहे.

35 वर्षांतला पहिला प्रयोग

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा व्यावसायिक नाटक निर्मितीचा 35 वर्षांतील हा पहिलाच प्रयोग असल्याचे अनिलकुमार साळवे यांनी सांगितले. 8 एप्रिल कोल्हापूर, 12 एप्रिल औरंगाबाद आणि 13 एप्रिलला अंबाजोगाई येथे प्रयोग होणार आहे. या शिवाय रत्नागिरी, भिवंडी, खोपोली, पुणे, पिंपरी चिंचवड येथील संस्थानीही विचारणा केल्याचे साहेबराव पाटील यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी

कलाकारांनी बेताची परिस्थिती असताना स्वत:चा पदरमोड करून या नाटकाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून मिळणारा पैसा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
डॉ.शशीकांत बर्‍हाणपूरकर , नाट्यशास्त्र विभागप्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

शांततेचा संदेश देणारे नाटक

खैरलांजीसारख्या घटना समाजाच्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. मात्र, कुठलाही वादग्रस्त मुद्दा न मांडता प्रभावीपणे हा मुद्दा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केला आहे.
अनिलकुमार साळवे, लेखक

प्रेक्षकांनी दाद द्यावी

मराठवाड्यातल्या कलाकारांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आता यश मिळायला लागले आहे. कथा खैरलांजीची हे त्याचेच उदाहरण आहे. या प्रयोगाच्या मागील भावनाही अत्यंत प्रामाणिक आहे. प्रेक्षकांनी याला भरभरून दाद द्यावी, हीच विनंती आहे.
साहेबराव पाटील, निर्मिती सहायक