औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी राज्यभरात संप व कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपाचा पुणे विभागात २४ वा दिवस आहे, तर मराठवाडा विभागात मागील दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे, त्यामुळे मराठवाडा विभागात शासनाचा सुमारे ४० लाखांचा महसूल बुडाला आहे.
भूमी अभिलेख विभागाचे औरंगाबादचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संपामुळे मोजणीची कामे बंद पडली असल्याने सर्वसामान्यांसह शेतक-यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी संप तत्काळ मागे घ्यावा अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. संपात सहभागी झालेल्या मराठवाडा विभागातील सुमारे ७०० कर्मचा-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, कर्मचा-यांनी नोटिसा न स्वीकारता आडमुठेपणाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी कर्मचा-यांवर राहील, असेही पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचा संपात सहभाग नसल्याचे संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस आर.एम. कांबळे यांनी कळविले आहे.
तत्काळ कामावर हजर व्हावे
कर्मचार्यांनी आंदोलन करून आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. त्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन करूनही त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यास सर्वस्वी कर्मचारीच जबाबदार असल्याची माहिती प्रदीप पाटील यांनी दिली.