आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Prevention Of Corruption,Latest News In Divya Marathi

फोनवर ‘हं..’ म्हणणेही लाचेचा पुरावा;‘रेकॉर्डेड टेप’द्वारे लाचखोरांना अडकवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणा-या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी (एसीबी) मोबाइलवरील संभाषणही आता वैध ठरणार आहे. लाचखोर आणि फिर्यादी यांच्या मोबाइलवरील संभाषणाची ‘रेकॉर्डेड टेप’हा प्राथमिक पुरावा म्हणून गृहीत धरण्यात येत आहे. मात्र एसीबीने पंचासमोर केलेले रेकॉर्डिंगच पुरावा म्हणून मान्य करण्यात येईल. शिवाय संभाषणात लाच मागणा-या व्यक्तीने केवळ ‘हं...’जरी म्हटले तरी त्या रेकॉर्डिंगच्या आधारे भ्रष्ट व्यक्तीवर कारवाई प्रस्तावित करता येईल.
सर्वसाधारणपणे पावडर लावलेल्या नोटा देऊन लाचखोर व्यक्तीच्या बोटांच्या ठशांना पुरावे म्हणून गोळा करण्याची पद्धत एसीबीकडून अवलंबली जाते. त्याशिवाय पंचासमोर आलेले पुरावेही नेहमीप्रमाणे न्यायालयीन खटल्यांमध्ये वापरले जातात. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमानस खवळल्यामुळे एसीबीमार्फत आता भ्रष्ट व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. न्यायालयात आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून प्रत्येक पुरावा महत्त्वपूर्ण आहे. लाच देणारा फिर्यादी आणि लाचखोर व्यक्तींचे दूरध्वनी, मोबाइलवरील संभाषण आता प्राथमिक पुरावा म्हणून गृहीत धरण्यात येत आहे.
फिर्यादीने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांकडून लाचखोर व्यक्तीचे ‘टार्गेट’ निश्चित केले जाते. त्यानंतर अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ट्रॅप किंवा विविध उपयोगी पुरावे घेतले जातात. एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरध्वनीवरील संभाषणात फिर्यादीने रक्कम सांगितली आणि त्यावर लाचखोर व्यक्तीने ‘हं...’ एवढा शब्द जरी उच्चारला तरी त्या व्यक्तीविरोधात पुरावा समजण्यात येणार आहे. त्यामुळे अधिका-यांचे काम अधिक सोपे झाल्याचेही सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एफएसएलचे प्रमाणपत्र न्यायालयात
मोबाइल संभाषण हा काही अंतिम पुरावा नाही, मात्र लाचखोराच्या आवाजाचा नमुना आणि रेकॉर्डिंगमधील आवाज यामध्ये साधर्म्य असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र घेतले जाते. मुंबईच्या कलिना कॅम्पसमध्ये ‘फॉरेन्सिक सायन्स लॅब’ (एफएसएल) च्या अहवालानुसार हा पुरावा अधिक भक्कम होतो. न्यायालयात इतर पुराव्यांसोबत सादर केल्यास शिक्षेचे प्रमाणही वाढण्याची अपेक्षा एसीबीच्या अधिका-यांना आहे.