आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Detailed News About Draught Condition Of Marathwada

मराठवाड्यातील १९,२७४ गावे दुष्काळाच्या कराल दाढेत, पिकांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद | भीषण दुष्काळाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल होत आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील १९,२७४ गावांतील पिकांची सरासरी पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी मराठवाड्यात इनमीन ५३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे अन्न, पिण्याचे पाणी आणि गुरांचा चारा अशा सर्वच संकटांना सामोरे जावे लागणार आहे. सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणारा मराठवाडा मेटाकुटीला आलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद, जालना,नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने हातातोंडाशी आलेल्या कापसासह खरिपाच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. मात्र, उस्मानाबादेत झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईचे संकट टळण्यास मदत होणार आहे.

दुष्काळाच्या खाईत जिल्हानिहाय गावे
- औरंगाबाद१३३६
- जालना ९७०
- बीड१३७७
- नांदेड१५७५
- लातूर९४५
- उस्मानाबाद ३१८
- हिंगोली७०७
- परभणी८५२
मोजक्याच गावांतील पीक स्थिती चांगली
औरंगाबादेतील ४६, बीडमधील २६, लातूरमधील २ गावे व उस्मानाबादमधील भूम, वाशी, उस्मानाबाद तालुक्यातील पैसेवारी ५०% पेक्षा जास्त आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात जास्त तीव्र चटके
गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाळ्यात बिकट असेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात गुरांच्या छावण्या लावाव्या लागणार आहे.
१५ दिवसांत आक्षेप, नंतर अंतिम पैसेवारी
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली ही अंतरिम आणेवारी असून शनिवारपासून पंधरा दिवसांच्या आत शेतक-यांना या पैसेवारीवर आक्षेप नोंदवता येतील. आक्षेप आणि तक्रारींची दखल घेतल्याानंतर डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात अंतिम पैसेवारी जाहीर हाेईल.
औरंगाबाद जिल्ह्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने
पैसेवारी ५० टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, असा सर्वांचाच अंदाज खरा ठरला असला तरी कन्नड आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतील प्रत्येकी २३ गावांतील पैसेवारी ५० च्या पुढे असून त्यावर आक्षेप घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आहे. शेतक-यांनी यावर योग्य तो आक्षेप घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आक्षेप-तक्रारींची दखल घेतल्यानंतर १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर केली जाणार आहे. एकूणच जिल्ह्याची वाटचाल दुष्काळसदृशतेच्या दिशेने सुरू आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात २३ टॅँकर सुरू आहेत. हे सर्व पैठण व वैजापूर तालुक्यांत आहे. डिसेंबरअखेर ८५ टॅँकर लागतील, असा अंदाज आहे. फुलंब्री तालुक्यातील ९२ गावांपैकी ९० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. यामुळे या तालुक्यात भीषण स्थिती असणार आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. २०१४ प्रमाणेच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात गुरांच्या छावण्या लावाव्या लागतील, असे अपेक्षित आहे. यंदा जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतक-यांनी पीक विमा काढला असून पैसेवारी ५० च्या खाली आल्याने त्यांना विम्याची रक्कम शत-प्रतिशत मिळू शकेल.
यंत्रणेची अधिकृत पैसेवारी ५० टक्क्यांच्या खाली
सिल्लोड, कन्नडमधील प्रत्येकी २३ गावांमधील पैसेवारी ५० पेक्षा जास्त
पीक विम्याचा वैयक्तिक फायदा
सुधारित पैसेवारी जाहीर, आक्षेप घेण्याचे आवाहन
आक्षेप न घेतल्यास १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी समोर येणार असे आहे
जिल्ह्याचेे चित्र
जिल्ह्यातील गावे - १३८२
५० टक्क्यांच्या पुढे पैसेवारी - ४६ गावे
सिल्लोड व कन्नड तालुक्यातील प्रत्येकी २३ गावांचा समावेश
उर्वरित १३३६ गावांची पैसेवारी - ५० पैशांच्या खाली.
"त्या' ४६ गावांचे काय?
१३८२ पैकी फक्त ४६ गावांतील पैसेवारी ही ५० च्या पुढे गेली. त्याचे कारण तेथील भौगोलिक परिस्थिती असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित मोजणीतही गडबड होऊ शकते. त्यासाठी येथील शेतक-यांनी पुढील १५ दिवसांत तहसीलदारांकडे लेखी आक्षेप द्यावेत. आक्षेप घेतल्यास तज्ज्ञांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा पीक तपासणी केली जाईल. त्यानंतर १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर केली जाईल.
पुढे वाचा, दुष्काळाच्या जखमेवर शिडकावा...